Mon. Oct 26th, 2020

खाजगी क्लासेस घेणाऱ्या शाळेतील शिक्षकांवर कठोर कारवाई होणार – विनोद तावडे.

कोचिंग कलासेस अधिनियम २०१८ च्या कच्च्या मसुद्यात फेरबदल होणार. ठाणे कोचिंग क्लासेस संघटनेचा मोठा विजय.

कोचिंग कलासेस अधिनियम २०१८ चा कच्चा मसुदा अन्यायकारक असून त्याचा पुनर्विचार व्हावा आणि या समितीवर सर्वसामान्य क्लास संचालकांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळावे तसंच जाचक अटी रद्द व्हाव्यात या मागणीसाठी ठाणे कोचिंग कलासेस संघटनेसह इतर संघटनांनी केलेल्या आंदोलनाची दखल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेत समाधानकारक उत्तर दिली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ठाणे कोचिंग क्लासेस संघटनेचे सचिव सचिन सरोदे यांनी दिली.

या मसुद्यातील अन्यायकारक जाचक अटी आणि यातील त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाणे कोचिंग क्लासेस संघटना आणि इतर संघटनांनी २७ फेब्रुवारी रोजी निषेध मोर्चा काढला होता. तसंच शासनाच्या या मसुद्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांनी एकत्र येत १९ जुलै २०१७ रोजी नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या बाहेर धरणं आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची व्यापकता लक्षात घेता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विविध संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या संघटनेच्या आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण दिले होते. यावेळी या मसुद्यात इंटिग्रेटेड क्लास घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले असून त्यांच्या या मताला शिष्टमंडळातील सर्व सदस्यांनी एकमुखी संमती दर्शविली.

तसंच या मसुद्याबाबत आलेल्या सूचना, हरकती आणि आक्षेप यांचा विचार करता या मसुद्यात घरगुती क्लासेस , इतर लहान सर्वसामान्य क्लासेस आणि मोठी जास्तीची फी घेणारे क्लासेस अशा तीन गटात विभागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. तसंच या चर्चेदरम्यान संघटनेच्या प्रकाश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेल्या दुहेरी शिक्षकांबाबत यापुढे शासन मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी जर असे क्लासेस घेतल्याचं निदर्शनास आल्यास शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा तावडे यांनी दिला आहे.

तसंच येत्या काही दिवसांत मसुद्यासंदर्भात होणाऱ्या मुंबई येथील बैठकीला ठाणे संघटनेच्या सभासदांना बोलाविण्यात येईल असं आश्वासन दिल असल्याची
माहिती यावेळी देण्यात आली. तसेच सर्वसामान्य क्लास संचालकांच्या हाकेला साद देऊन अडचणीच्या काळात संघटनेचा आवाज विधानसभेपर्यंत पोचविणाऱ्या सर्वांचे आभार ठाणे कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

760 Views
Shares 66