Mon. Oct 26th, 2020

ठामपा मुख्यालयातील सर्व विभागांचे फायर ऑडिट करा – मनसेचे महेश कदम यांची आयुक्तांकडे मागणी.

ठामपा मुख्यालयातील सर्व विभागांचे फायर ऑडिट करा – मनसेचे महेश कदम यांची आयुक्तांकडे मागणी.

ठाणे प्रतिनिधी:- ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील शहर विकास विभागातील गैरव्यवहारामुळे महापालिका इमारत आगीच्या सावटाखाली असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर आता मनसेनेही या विरोधात दंड थोपटले आहेत. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकारी आणि विकासक यांच्यातील संगनमताने झालेले गैरव्यवहार जनतेसमोर येण्याची कुणकुण संबंधित अधिकारीवर्गाला लागली आहे.त्यामुळे या संदर्भातील फाईल्स व कागदपत्रे गहाळ होऊ शकतात.अथवा गेल्या काही वर्षांपासून पालिका मुख्यालयाचे फायर ऑडिट झालेले नसल्याने एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच फायर ऑडिट करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.

काही दिवसापूर्वी मुंबईतील जीएसटी भवन पेटले होते. तर,यापूर्वी मंत्रालयाला आग लागून महत्वपूर्ण कागदपत्रांची होळी झाली होती.या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातही अनेक गैरव्यवहारांची कुजबुज सुरु झाली आहे. या विभागाने काही वर्षांपासून अनेक विकासकांच्या इमारतींचे वादग्रस्त प्रस्ताव मंजूर करून विकासक व त्यांच्या हस्तकांना धडाधड टीडीआर देऊन सीसी, ओसीदेखील प्रदान केलेत. यातील काही वादग्रस्त प्रस्तावांबाबत अनेक तक्रारी सरकारदरबारी दाखल असून काही प्रकरणामध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल आहेत. हे गैरव्यवहार बाहेर पडण्याची कुणकुण काही अधिकाऱ्यांना लागली असल्याने याबाबतची कागदपत्रे गहाळ होऊ शकतात. अशी शंका महेश कदम यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. दुसरीकडे गेल्या १ ते २ वर्षांपासून पालिका मुख्यालय इमारतीचे फायर ऑडिट न झाल्याने त्वरित फायर ऑडिट करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये , जीवितहानी होऊ नये आणि कागदपत्रे सुरक्षित राहतील याची दक्षता महापालिकेने घ्यावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान,भाजप पाठोपाठ मनसेनेही ठाणे महापालिका आगीच्या सावटाखाली असल्याची शंका व्यक्त केल्याने पालिकेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

855 Views
Shares 0