Mon. Oct 26th, 2020

ठाणेकरांचे पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण होणार. स्टेशनजवळील वाहतूक कोंडीही सुटणार!

ठाणे (18) :- ठाणे शहराच्या वैभवात ऐतिहासिक भर घालणा-या पारसिक चौपाटी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या जूनअखेरपर्यंत ठाणेकरांचे चौपाटीचे ऐतिहासिक स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याबाबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पावले उचलण्यास सुरूवात केली असून त्याबाबतही लवकरच ठोस निर्णय घेण्यात येणार आहे.

आज सकाळपासून जवळपास 5 तास जयस्वाल यांनी विविध प्रकल्पांची, रस्त्यांची, पारसिक चौपाटी आणि स्टेशन परिसराची झाडाझडती घेतली. यावेळी स्टेशन येथे त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त(1) सुनील चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळी 10 वाजता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घोडबंदर रोडपासून आपल्या पाहणी दौ-यास सुरूवात केली. पोखरण रोड नं. 3, टिकुजिनी वाडी, ग्लॅडी अल्वारीस मार्ग, गांधीनगर चौक, पोखरण रोड नं. 2 या रस्त्यांची पाहणी करून सदर काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी नगर अभियंता अनिल पाटील यांना दिले.

त्याचवेळी त्यांनी गांधीनगर ते शिवाईनगर चौकपर्यंत सुरू असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामाची पाहणी करून सदर सायकल ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच व्होल्टास कंपनी येथील नाल्यावरील पूलाची रूंदी वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.

जयस्वाल यांनी पोखरण रोड नं. 2 पासून घाणेकर नाट्यगृहपर्यंत जाणा-या रस्त्याच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त करून या रस्त्यामध्ये येणारे प्रार्थना स्थळ स्थलातंरीत करण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर जयस्वाल यांनी ठाणे शहराच्या वैभवात भर घालणा-या पारसिक चौपाटीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच चौपाटीला जोडून तयार करण्यात येत असलेल्या सेवा रस्त्याचे कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. येत्या जून अखेरपर्यंत ठाणेकरांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी नगर अभियंताआणि संबंधित ठेकेदार यांना दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, शहर विकास व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, कार्यकारी अभियंता मोहनकलाल, सुधीर गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिरिक्त आयुक्त (1) सुनील चव्हाण, वाहतूकशाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्यासह स्टेशन परिसराची पाहणी केली.

यावेळी त्यांनी गावदेवी मैदानातील भुयारी वाहन तळाबरोबरच गावदेवी उद्यानामध्येही भुयारीवाहनतळ सुरू करता येईल का याची चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच गावदेवी मैदान येथे सायंकाळी 6 ते 10 या वेळेत तात्पुरती पार्किंग व्यवस्था करता येईल का ही शक्यताही पडताळून पाहण्यास सांगितले.

त्‍याचप्रमाणे स्टेशन परिसरातील रिक्षांसाठी पर्यायी मार्गिका काढता येवू शकते का ? याबाबतही पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

187 Views
Shares 0