Mon. Oct 26th, 2020

पोलीस खबरी आणि एमडी तस्कर कौमील मर्चंटला गोव्यातून अटक.

ठाणे : मुंब्र्यात एमडी पावडरसह पकडण्यात आलेल्या दोन आरोपींच्या चौकशीत एमडी पावडरचा घाऊक व्यापारी कौमील मर्चंट हा असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांचा एक नंबरचा खबरीच अंमली पदार्थाचा तस्कर निघाल्याने एकाच खळबळ उडाली होती. १४ नोव्हेंबर, पासून फरारी झालेल्या कौमील  याला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने गोव्याच्या पणजी येथून १६ डिसेंबर रोजी  अटक केली. त्याला न्यायालयात नेले असता १९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कौमील  याला राजकीय आशीर्वाद होता. मात्र त्याच्या अटकेने आता त्या नेत्यांची भांडी फुटण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

पोलीस अधिकारी यांची ओळख आणि राजकीय नेत्यांचा आशीर्वाद यामुळे कौमील मर्चंट हा मोठा एमडी तस्कर झाला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने १४ नोव्हेंबर, २०१७ रोजी मुंब्रा भागातून एमडी साठ्यासह आरोपी मुबस्सीर हमजा माटवनकर  आणि मोहम्मद शय्यान अब्दुल सकुर खान यांना अटक केली. या दोघांकडून ७५ ग्राम एमडी पावडरही हस्तगत करण्यात आली होती. आरोपींच्या चौकशीत एमडी पावडर ही आरोपी  सिराज शेख नसीर मुन्शी याने विक्रीसाठी दिल्याची माहिती मिळताच पोलिसांनी १७ नोव्हेंबर,२०१७ रोजी मुन्शी याला अटक केली. त्याच्याकडे ६० ग्राम एमडी सापडली. त्याची अधिक चौकशी केली आणि धक्कादायक माहिती बाहेर आली. एमडीचा तस्कर हा पोलीस खबरी असलेला कौमील मर्चंट असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस पथकाचा ससेमिरा मागे लागल्याचे समजताच मर्चंट याने पळ काढला. तेव्हापासून तो फरारी होता.

अखेर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला कौमील हा गोवा राज्यातील पणजी येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने कौमील मर्चंट याला १६ डिसेंबर, २०१७ रोजी अटक केली. त्याची चौकशी सुरु असून १९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.

196 Views
Shares 0