Tue. Dec 1st, 2020

दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी ठाणे महापालिका व्यावसायिक केंद्रे उभारणार.

ठाणे (२८ ) : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे गरजेचे असून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी  दिव्यांग व्यक्तींकरीता स्वतंत्र  व्यावसायिक केंद्रे उभारण्याचा ठाणे  महापालिकेच्यावतीने मानस असल्याचे मत महापौर मिनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले. जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त राम गणेश गडकरी येथे  आयोजित समारंभात त्या बोलत होत्या.
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा या विशेष शाळेतील तसेच ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध शाळांमधील दिव्यांग मुलांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. जिद्द शाळेतील मुलांच्या प्रार्थना गायनाने या समारंभाची सुरुवात झाली.

यावेळी दिव्यांग पाल्यांचा सांभाळ करणाऱ्या पालकांचे महापौर मिनाक्षी शिंदे यांनी विशेष आभार मानले. ठाणे महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात असून येणाऱ्या काळात देखील महापालिका दिव्यांगांसाठी विविध योजना राबण्याचा प्रयत्न करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या समारंभात दिव्यांग व्यक्तींच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नृत्य, गायन ,वादन असे  विविधांगी कार्यक्रम सादर झाले. अभिनेता जयवंत भालेराव  यांनी आपल्या एकपात्री  सादरीकरणातून कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली. त्यांनी सादर केलेल्या नकलांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.

173 Views
Shares 9