Wed. Mar 29th, 2023

सायबर गुन्ह्यांपासून कसा बचाव कराल?

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांची खास मुलाखत.

ठाणे:- आधुनिक युगामध्ये संगणकाचा तसेच इंटरनेट चा वापर झपाट्याने वाढत आहे. शासकीय योजनेचा लाभ असो वा बॅकेचे व्यवहार असूद्यात, ऑनलाइन खरेदीसाठी इंटरनेट आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करणे आवश्यक बनला आहे. सोशल मिडिया मध्ये फेसबुक , व्हाटसअप,ट्विटर यासारख्या माध्यमांचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. परंतु या माध्यमाचा गैरवापर समाजातील गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक करताना दिसतात. अशा प्रकारचे गुन्हे गुन्हेगार कशा प्रकारे करतात आणि समाजाने त्यांनी दाखवलेल्या आमिषांना बळी पडू नये तसेच अशा गुन्ह्याचा शोध घेण्याचे काम पोलीस  कशा पद्धतीने सायबर गुन्हे शाखेमध्ये केले जातात याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आपल्या मुलाखतीतून दिली.

सायबर गुन्हे नेमके कसे होतात?

सायबर गुन्ह्यामध्ये प्रमुख पाच ते सहा प्रकार असतात. जसे की, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात आले आहे ,किंवा आपली क्रेडिट मर्यादा वाढवायची आहे,  आपला आधार नंबर लिंक करायचा आहे, आपणास मोठ्या रक्कमेची लॉटरी लागली आहे असे फोन येऊन मिळालेल्या माहितीचा गैरवापर केला जातो. ई मेल , एसएमएस द्वारे आपली बँकिंग माहिती विचारली जाते आणि त्या माहितीचा देखील दुरुपयोग होतो.  बँकेकडून कमी व्याज दराने लोन मिळवून देऊ त्यासाठी प्रोसेसिंग फी च्या नावाने पैसे उकळले जातात. तसेच व्यवसायिक  प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना गाडी चालकासहित भाड्याने लावतो , तुम्ही फक्त गाड्या घेण्यासाठी आपल्या नावाने पैसे भरा असे खोटे नाटे सांगितले जाते.

बँकांचे व्यवहार करतांना कोणती सावधगिरी आवश्यक आहे?

बँकेचे एटीएम मध्ये कार्ड स्वाईप करताना गुन्हेगार तिथे स्कीमर लावून तुमचा मॅग्नेटिक माहिती रिड करून तुमची माहिती मिळवून पैसे काढतात. आपण  बँकेचे एटीएम ने पैसे काढते वेळी तिथे आपणास कोणता कॅमेरा तर पाहत नाहीना किंवा पासवर्ड टाकत असता ना कोणती व्यक्ती तुम्हाला बघत नाही ना या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच एटीएम मशिनच्या कीबोर्डवर  किंवा आसपास काही संशयास्पद वाटले तर सावध राहावे.

लॉटरी लागली आहे बक्षिसाची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी आपल्या एटीएम ची माहिती  विचारणारे  ई मेल, कॉल,मेसेज आल्यावर त्यांना कोणतीही माहिती देऊ नये.

महिलांची कशी फसवणूक होते? काही गुन्हे उघड झाले आहेत का?

महिलांना फेसबुक तसेच मैट्रिमोनियल म्हणजे वधूवर सूचक साईट वरून खोटे प्रोफाईल नोंद करून  विवाह जमवण्याचे आमिष दाखवून फसविण्याचे गुन्हे होतात. ठाणे पोलिसांनी असे गुन्हे उघड करून ४ नायरेजीयन गुन्हेगारांना पकडले आहे.  स्त्रियांचे फोटो ,नावे वापरून त्याचा गैरवापर करून त्यांना बदनाम करण्याची धमकी देणे असे प्रकार घडू नये म्हणून अनोळखी व्यक्तीची महिलांनी फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारू नये .

पासवर्डविषयक काय काळजी घ्यावी ?

तुमचा पासवर्ड सहज तर्क लावून ओपन होईल असा असू नये,आपला सोशल साईट चा पासवर्ड सुरक्षेसाठी दर तीन महिन्यांनी बदलावा तो  उदाहरणार्थ स्वत:ची जन्म तारीख, मुलाचे नाव मोबाईल क्रमांक इत्यादी,पासवर्ड अप्पर केस लोअर केस असावा त्यात स्पेशल कॅरेक्टर चा असावा जेणे करून तो क्रॅक करता येवू नये,पासवर्ड कोठेही लिहून ठेऊ नये ज्याचा गैरवापर होईल. त्याच प्रमाणे बँकेचे व्यवहार करताना आपल्याला मोबाईलवर येणारा ओटीपी (OTP)क्रमांक सांगू नये त्यांची अनोळखी व्यक्तीला देवाण करू नये ..

फसवणाऱ्या स्कीम्सपासून कशी काळजी घ्यावी?                                                                                                                घरबसल्या ४० हजार ची नोकरी मिळवा किंवा माझ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या ओळखी आहेत तुमचे सरकारी नोकरीचे काम करतो अशी खोटी आश्वासने देवून पैसे घेतले जातात या पद्धतीचा वापर करून ही फसवले जाते त्याला हि जनतेने बळी पडू नये .एखादी कंपनी आरओसी रजिस्टर म्हणजे गुणवत्ता नव्हे ती  असली किंवा त्या कंपनीची वेबसाईट असली म्हणजे ती आपणास फसवणार नाही असा अर्थ होत नाही .गुगल वरती वेबसाईट काही पैसे खर्च  केल्यावर कोणीही कंपनी ची साईड बनवू शकतो .अशा वेबसाईट वर विश्वास न ठेवता त्या कंपनीचा विश्वसनीय माहिती घेवूनच व्यवहार करावेत .
गुन्हेगार नागरिकांना सांगतात कि आम्ही अमुक एका कंपनी चे भागीदार आहोत त्यात पैसे गुंतवल्यास तुम्हाला त्यात फायदा होईल अशा प्रकारचे अवास्तव क्लेम करत असेल तर त्याबद्दल सावध राहिले पाहिजे,अशा प्रकारच्या पोन्झी स्कीमना जनतेने बळी पडले नाही पाहिजे .फसव्या जाहिराती पासून दूर रहावे.

सोशल नेटवर्किंग तसेच प्रसार माध्यमाचा वापर समाज प्रबोधनासाठी जसा केला जातो, त्याचप्रमाणे समाजकंटक राष्ट्रीय पुरुष तसेच समाजाविषयी जातीधर्माविषयी आक्षेपार्ह मजकुराची पोस्ट करून लोकांच्या भावना दुखवतात तशा पोस्ट किंवा मेसेज आल्यास आपण डिलीट करून टाकाव्यात .

ठाणे सायबर सेल टीम ने सर्व सोशल नेटवर्किंग साईटस आणि प्रसार माध्यमाच्या समन्वय अधिकार्यांशी विशेष संबंध प्रस्थापित करून माहिती लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करतात ,गुन्हेगारांचा निश्चित ठावठिकाणा शोधण्यासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त केले असून वेळ प्रसंगी खाजगी तज्ञ व तंत्रज्ञ यांची मदत घेवून गुन्ह्याचा तपास करत आहे . हार्डडिस्क अॅनालाझर सॉफटवेअर इनकेस व हार्डडिस्क राईट ब्लॉकर  हे हार्डवेअर चा वापर केला जातो .

जनतेची फसवणूक होऊ नये या साठी ट्रान्स्फोर्मिग महाराष्ट्र या शासनाच्या मोठ्या कार्यक्रमा अंतर्गत ठाणे पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीस हे वेगवेगळे सायबर क्राईम जनजागृतीसाठी शाळा ,महाविद्यालय,जेष्ठ नागरिकांचा कट्टा ,सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम केले आहेत ,सोशल मीडियातून संदेश पोहोचवले आहेत .

कोणत्याही आर्थिक अमिषाला ,फसव्या जाहिरातीना जनतेने फसू नये मी विनंती करतो कि आपण अशा प्रकारच्या सायबर क्राईम पासून बचाव करावा .असा प्रकार आपल्या सोबत होत आहे असे आपणास लक्षात आल्यास पोलिसांकडे  तक्रार करावी .

74794 Views
Shares 31