Sun. Jul 3rd, 2022

देशातील पहिल्या डिजीसिटी प्लॅटफाॅर्मचे ठाण्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे हस्ते लोकार्पण. ठाणे ठरले ईस्रायल-भारत संबंधांचे गेट वे.

ठाणे (२३):- ईस्रायल आणि भारत यांच्या संबंधाचे गेट वे ठरणा-या मुल्यवर्धित सेवा, नागरिकांसाठी डिजीटल व्यवहाराचे महत्वाचे व्यासपीठ असलेल्या जगातील दुस-या आणि भारतातील पहिल्या डिजीसिटी प्लॅटफाॅर्मचे आज ठाण्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री, ठाणे जिल्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण झाले.

डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ठाण्याच्या प्रथम नागरिक मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या भव्य समारंभास
इस्रायलच्या तेल अवीव जाफा शहराचे महापौर डाॅ. राॅन हुलदाय, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मडवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर, एचडीएफसी बॅंकेच्या रिटेल ब्रॅंच बॅंकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष सारंग दाणी, टीएसजीचे उपाध्यक्ष(आयटी) गाली मिखैली, तेल अवीव महापालिकेचे नाॅलेज आॅफिसर जोहार शेराॅन, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ठाणे स्मार्ट सिटीचे संचालक व नगरसेवक मिलिंद पाटणकर, यासीन कुरेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि तेल अवीव शहराचे महापौर राॅन हुलदाय यांनी या प्रकल्पाच्या निमित्ताने इस्रालय आणि भारत या दोन्ही देशांमधील संबंधाना सुरूवात झाली असल्याचे सांगितले. तर शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या निमित्ताने ठाणे शहर जगाच्या नकाशावर कोरले गेले असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याहस्ते एचडीएफसी बॅंकेच्या सहकार्यातून तयार करण्यात आलेल्या डीजीकार्डच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले.

इस्रालयमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर डिजीसिटी प्लॅटफाॅर्मची निर्मिती करण्यात आली असून या प्लॅटफार्मच्या माध्यमातून नागरिकांना डिजीटल व्यवहाराचे मोठे व्यासपीठ निर्माण झाले असून सीटीकार्ड, मोबाईल ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध मुल्यवर्धित सेवांचा लाभ घेता येणार आहे.

या निमित्ताने सरकार ते नागरिक, सरकार ते व्यावसायिक आणि व्यावसायिक ते नागरिक अशा दुहेरी मार्गाचा अवलंब करण्यात येणार असल्याने नागरिकांना मुल्यवर्धित सेवांचा फायदा मिळणार आहेच त्याप्रमाणे नागरिकांना हाॅटेल्स, प्रवास, शिक्षण, गृह आदी सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

तेल अवीव शहरानंतर संपूर्ण जगात अशा प्रकारचा डिजीटल प्लॅटफाॅर्म असलेली ठाणे ही जगातील दुसरे आणि भारतातील पहिले शहर आहे.

प्रारंभी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रवास कथन केला. तर अतिरिक्त आयुक्त(१) तथा ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चव्हाण यांनी आभार व्यक्त केले. शेवटी राष्ट्रगीताने समारंभाची सांगता करण्यात आली.

67145 Views
Shares 0