Sun. Jul 3rd, 2022

ठामपा परिवहन सेवेच्या ‘कथुली’ या नाटकास उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके.

ठाणे : 65 व्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यमहोत्सवात ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या ‘कथुली’ या भक्तीमय नाटकास उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. या नाटकातून विठ्ठलाची व्यक्तिरेखा साकारणारे मोहन पानसरे तसेच रुक्मिणी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रतिभा घाडगे यांना उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त  झाले आहे. पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांचा महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

‘कथुली’ या नाटकात आजच्या युगातील विठ्ठल रुक्मिणीची व्यथा मांडण्यात आली आहे. माधव साने यांनी या नाटकाचे लेखन केले असून दिग्दर्शन अभिनय कट्टयाचे कबीर शेख यांनी केले आहे. अभिनय कट्टयाचे संचालक किरण नाकती यांचेही मार्गदर्शन या नाटकास लाभले आहे. अतिभव्य नेपथ्‌य, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा, उत्कृष्ट पार्श्वसंगीत आदीबांबतही हे नाटक अव्वल ठरले आहे.

परिवहन सेवेचे व्यवस्थापक संदीप माळवी, परिवहन सभापती अनिल भोर तसेच परिवहन सदस्यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षापासून खंडित झालेली नाट्यचळवळ पुन्हा सुरु झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच भविष्यातही ही चळवळ अधिक जोमाने सुरू राहिल असा विश्वासही कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘कथुली’ या नाटकात मोहन पानसरे, अर्जुन नाईक, श्रीराम विधाटे, माधुरी कोळी, प्रमोद कोळी, नरेंद्र सावंत, मधुकर गावडे, अशोक वाघमारे, शिरिष दळवी, नागेश जुवेकर यांनीही भूमिका साकारल्या आहेत.

75132 Views
Shares 0