Tue. Oct 26th, 2021

नगरसेवक,आरटीआय कार्यकर्ते यांच्या जाचाला कंटाळून कॉन्ट्रॅक्टर संकेत जाधवची आत्महत्या.

नगरसेवक,आरटीआय कार्यकर्ते यांच्या जाचाला कंटाळून कॉन्ट्रॅक्टर संकेत जाधवची आत्महत्या.

दोषींवर कारवाई करण्याची त्यांच्या भावाची मागणी.
ठाणे : प्रतिनिधी

ठाणे महानगर पालिकेत ठेकेदार म्हणून काम करणारा संकेत जाधव(३५) याने रिव्हॉल्व्हर मधून स्वतःवर गोळी झाडून ५ नोव्हेंबर २०१७ रोजी आत्महत्या केली. ठाणे पालिकेचे नगरसेवक, कार्यकर्ते, यांनी दिलेला मानसिक त्रास आणि पैशाच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याची लेखी तक्रार त्याचा भाऊ वीरधवल जाधव याने केली आहे.

दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक, पोलीस उपायुक्त, नौपाडा, कासारवडवली पोलीस ठाणे आणि खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली  आहे.

संकेत जाधव याचे “संकेत कन्स्ट्रक्शन” नावाची कंपनी होती. या कंपनीच्या माध्यमातून ठाणे पालिकेचे टेंडर घेऊन कामे करण्यात येत होती. संकेत याच्या या कामाच्या खोट्या तक्रारी करून , माहितीच्या अधिकारात माहिती मागवून टेंडर रद्द करण्याची धमकी देत १० लाखाची मागणी केल्याने आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. भावाला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी भाजप जेष्ठ नगरसेवक संजय संतू वाघुले, सचिन करलाद, सचिन केदारी, ललित विभुते, प्रदीप पाटील हे जबाबदार असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात वीरधवल जाधव याने केली आहे. २०१७ मध्ये नौपाडा समितीत यूटीडब्ल्यूटी रस्त्याचे काम वैष्णव कन्स्ट्रक्शन आणि अश्विनी इन्फ्रा. डेव्हलपमेंट प्रा. लि. यांनी भागीदारीमध्ये काम घेतले. त्या रस्त्याचे लेबर काँट्रॅक्स्टर म्हणून मृतक संकेत जाधव काम करीत होता. भाजप नगरसेवक संजय वाघुले आणि त्यांचे हस्तक हे खोट्या तक्रारी करून काम रद्द करण्याची धमकी देत होते. तक्रारी मागे घेण्यासाठी १० लाख दे नाहीतर काम बंद पाडू अशी धमकी दिल्याचा उल्लेख वीरधवल जाधव याने निवेदनात केला. याच त्रासाला कंटाळून ५ नोव्हेंबर,२०१७ रोजी संकेतने नैराश्येतून आत्महत्या केली त्याला प्रवृत्त करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत भाजप जेष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आजपर्यंत आपण कधीही संकेत किंवा त्याचा भाऊ वीरधवल यांना फोन केलाच नाही. आपण महर्षी कर्वे रोडच्या कामाची तक्रार केली. त्याठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना नव्हत्या, तसेच कामाच्या ठिकाणी कामाची माहिती देणारा फलक नव्हता त्याची तक्रार केली होती. तसेच प्रभाग ३० मध्ये नाना नाणी पार्कचे बिल काढले पण नानानाणी पार्कचं नसल्याचे समोर आले. त्याबाबत तक्रार केल्याचे वाघुले यांनी सांगितले.

16182 Views
Shares 0