Mon. May 23rd, 2022

महाराष्ट्रातील पहिला पीआरटीएस प्रकल्प ठाण्यात.

वाहतुक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  पीआरटीएस प्रकल्पाचे सादरीकरण.

ठाणे : प्रतिनिधी

सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करणा-या तसेच मेट्रो प्रकल्पाला पुरक ठरणारी वैयक्तिक जलद वाहतूक यंत्रणा अर्थात पीआरटीएस प्रकल्प राबविण्याबाबतची अनुकुलता ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दर्शविली असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठीची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाच्या आढावा बैठकीत आज पीआरटीएस प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळीजयस्वाल यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतची शक्यता वर्तविली. यावेळी अंतर्गत मेट्रोबरोबरच पीआरटीएसची मार्गिकाही अंतीम करण्याबाबत चर्चा होवून पुढील आठवड्यात याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, एमएमआरडीएचे अधिकारी, मेट्रोचे सल्लागार आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. अतिशय कमी जागेत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असून या वाहनाची क्षमता कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त ६ व्यक्ती बसतील एवढी आहे. ड्रायव्हरविरहित लेसरवर आधारीत तंत्रज्ञानावर आधारीत ही यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे पीआरटीएसचा ट्रॅकही प्रीफॅब्रिकेटेड पद्धतीने कमी वेळात बनविता येवू शकतो.महाराष्ट्र मेट्रोतंर्गत वडाळा ते कासारवडवली या दरम्यान मेट्रो धावणार आहे. त्याचबरोबर अंतर्गत मेट्रोची मार्गिका अंतीम करून त्या मार्गिकेला पीआरटीएस जोडल्यास प्रवाशांना मेट्रो पकडण्यासाठी जी पायपीट करावी लागणार आहे ती पूर्णत: थांबणार आहे.

दरम्यान मेट्रोची मार्गीका ही घोडबंदर रोडवरून कासारवडवलीपर्यंत असल्याने कळवा आणि मुंब्रा याठिकाणच्या प्रवाशांना पीआरटीएसचा फायदा होणार आहे. अंतर्गत मेट्रोच्या मार्गिकेला पीआरटीएसची मार्गिका जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना दुहेरी फायदा होणार आहे.

या बैठकीत मेट्रो आणि पीआरटीएस मार्गिका अंतीम करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी अधिका-यांना दिल्या असून पुढील आठवड्यात यावर अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे.

13985 Views
Shares 0