Mon. May 23rd, 2022

ठाण्यातील कोचिंग क्लासेस संघटना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भरविणार क्लास.

कच्च्या मसुद्यावर नोंदविण्यात आलेल्या हरकती सुचनांची शासनाकडून दखल नाही.
कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भरणार क्लास

ठाणे, दि. २२ – शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने खाजगी क्लासेसवर नियंत्रण ठेवण्याकरीता तयार करण्यात आलेल्या कच्च्या मसुद्यावर ठाण्यातील कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला होता. तसेच त्यावर हरकती व सुचना नोंदवून देखील त्याची शासनाने दखल न घेतल्याने कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी भव्य निषेध मोर्चासह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर  विद्यार्थ्यांचा क्लास घेवून अनोखे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव सचिन सरोदे यांनी दिली.

शैक्षणिक विभागाच्या वतीने खाजगी क्लासेसवर नियंत्रण ठेवण्याकरीता कच्चा मसुदा तयार करण्यात आला आहे . हा मसुदा हुकुमशाही स्वरुपाचा असुन ठाण्यातील कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने त्याला विरोध केला आहे. तसेच शासनाने या मसुद्यावर हरकती व सुचना मागविल्या होत्या. त्यावेळी संघटनेच्या वतीने या मसुद्याच्या विरोधात हरकती व सुचना नोंदविल्या होत्या. मात्र, त्याची शासनाकडून कुठलीही दखल घेतली नसल्याने ठाण्यातील कोचिंग क्लसेस संघटना अधिक आक्रमक झाली आहे. राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने महाराष्ट्रातील मोठ्या क्लास संचालकांना विश्‍वासात घेऊन लहान सर्वसामान्य क्लास बंद पाडण्याच्या हेतूने अन्यायकारक अतिशय जाचक असा खाजगी कोचिंग क्लासेस नियंत्रण कायदा (कच्चा मसुदा) तयार केला आहे. या मसुद्याचे कायद्यात रूपांतर करण्याच्या तयारीत शासन आहे. तसे झाले तर महाराष्ट्रातील बहुतेक सर्वसामान्य क्लासेस बंद होतील. सामान्य क्लास बंद झाले तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना क्लासमध्ये शिक्षण घेण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होईल तसेच सर्वसामान्य क्लास संचालकांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे या कच्च्या मसुद्याच्या विरोधात ठाण्यातील कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने मंगळवारी 27 फेब्रुवारी रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा क्लास घेण्यात येणार असल्याची माहिती सरोदे यांनी दिली.

या मोर्च्याला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी पार्टी या पक्षांनी देखील आपला पाठींबा दर्शविला असून या पक्षाचे प्रमुख पदाधिकारीही या मोर्च्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख, उपाध्यक्ष आनंद भोसले, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

23768 Views
Shares 1