Wed. Mar 29th, 2023

ठाण्यात सिलेंडरचा स्फोट दहा झोपड्या जळून खाक – जीवितहानी नाही.

ठाणे : प्रतिनिधी

ठाण्याच्या भीमनगर परिसरातील गांधीनगर झोपडपट्टी बहुल परिसरात घरातील गॅस गळतीने झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात दहा झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली असून घटनास्थळी अग्निशमनदलाने चार बंब, एक रेस्क्यू व्हॅन आणि पाण्याचा एक टँकरच्या साहाय्याने दीडतासात आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कुठलीही जीवितहानी  झाली नसून वित्तीयहानी  झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी दिली.

गांधीनगर हा बहुल झोपडपट्टीचा भाग असून या परिसरात तब्बल १ हजाराच्या आसपास अनधिकृत झोपड्या आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका घरातील सिलेंडरमधून गॅस गळती झाली. तर बाजूच्या घरातील सिलेंडरमधूनही गॅस गळती झाल्याने सिलेंडरचा स्फोट झाला आणि आसपासच्या दहा झोपड्यांमध्ये आग पसरली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने आग विझविण्याचे अथक प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या  जवानांनी   चार बंब,एक रेस्क्यू व्हॅन आणि पाण्याचा एक टँकरच्या  मदतीने आगीवर दीड तासात नियंत्रण मिळवले. दरम्यान आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचताच आले नाही. पाण्याच्या पाईपलाईन जवळून आग विझविण्याचे काम करावे लागले. घटनास्थळी  वर्तकनगर पोलीस, विद्युत मंडळाचे वायरमन, एचपी  गॅस कर्मचारी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी  व अग्निशमन दलाचे अधिकारी  उपस्थित होते. आगीत पांडुरंग महादेव धोत्रे,  मुकेश चव्हाण, दीपक प्रताप वारुळे, रोहित चव्हाण, बनारसी, राजेश सेवादास वाल्मिकी, मंदाकिनी वाल्मिकी. हरिवाजी सेवादास वाल्मिकी, ऋषिकेश नामदेव मोरे यांच्या झोपड्या जाळून खाक झाल्या आहेत.

55995 Views
Shares 0