Wed. Mar 29th, 2023

सफाई कामगारांना मिळाली आवास योजनेची घरे.

सफाई कामगारांना मिळाली आवास योजनेची घरे.
आ. केळकर यांच्या मुळे यंदाचा पाडवा होणार गोड.

ठाणे दि. ५ (वार्ताहर)- ठाणे महानगरपालिकेत २५ वर्षे सेवा पूर्ण झालेले पात्र सफाई कामगार आणि मृत कामगारांच्या वारसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत मोफत सदनिका मिळाल्या. सुमारे ५६ कुटुंबांना आ. संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दिलासा मिळाला आहे. हक्काची घरे या सफाई कामगारांना लवकरच मिळणार असल्याने यंदाचा पाडवा त्यांच्यासाठी नक्कीच गोड ठरणार आहे.

नगरविकास विभागाच्या शासननिर्णयानुसार ठाण्यात ही योजना राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेऊन पात्र लाभार्थींची बायोमेट्रीक पध्दतीने नोंदणी केली होती. त्यानंतर ७ जानेवारी २०१५ रोजी २७४ लाभार्थींची सोडत काढून त्यांना भायंदरपाडा आणि माजिवडा हद्दीत सदनिका देण्याचे ठामपाने जाहिर केले होते. भायंदरपाडा येथे तीन तर माजिवडा हद्दीत राबोडीमधील पंचगंगा गृहसंकुलामागे तळमजला अधिक सहा मजल्यांची इमारत बांधण्यात आली होती. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी भायंदरपाडा येथील तिन्ही इमारतींमधील सदनिका पात्र लाभार्थींना वाटप करण्यात आल्या होत्या, मात्र ५६ सदनिका असलेली राबोडी येथील इमारत गेली तीन वर्षे पडून होती. त्यामुळे वंचित सफाई कामगार आणि वारसदार हवालदिल झाले होते.

या प्रकरणी कर्मचारी आणि वारसदार यांनी अखेर भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन साकडे घातले. आ. केळकर यांनी संबंधित प्रशासनाशी पाठपुरावा करुन तीन वर्षे प्रलंबित काम तीन दिवसांत कार्यान्वित केले. इमारतीला नळजोडणी, ड्रेनेज,लिफ्ट आदी विविध सुविधा मार्गी लावल्या. सध्या ही इमारत सुसज्ज असून केळकर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी महावितरण आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. केळकर यांनी अधिकार्‍यांना वीज जोडणी चे मीटर तातडीने लावण्याचे आदेश महावितरण अधिकार्‍यांना दिले असता आठवड्याभरातच वीज मीटर जोडणी पूर्ण करू असे महावितरण अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच ही कुटुंबे त्यांच्या हक्काच्या घरात जाणार असून त्यांनी केळकर यांचे आभार मानले आहेत.

आ. संजय केळकर यांनी आमची व्यथा ऐकून जातीने पाठपुरावा केला. त्यामुळेच आम्हाला हे मोफत घर मिळू शकले,’ अशी प्रतिक्रिया ६७ वर्षीय लाभार्थी मनिषा पेडणेकर यांनी व्यक्त केली.

‘आमदारांनी आमच्या मुलाबाळांना हक्काचा निवारा मिळवून दिला. माझ्यासह ५६ वंचित कुटुंबांना दिलासा दिला असून केवळ आमदार संजय केळकर यांच्या मुळेच आमचा पाडवा गोड होणार आहे. त्यांचे ऋण कदापि फेडता येणार नाहीत,’अशा शब्दांत गणा गायकवाड (७०) या लाभार्थ्याने भावना व्यक्त केल्या.

यावेळी आ. केळकर यांनी या विषयात तातडीने सहकार्य केल्याबद्दल महापालिका व विजमंडळाचे आभार मानले.

27527 Views
Shares 80