Thu. May 13th, 2021

कळवा पारसिक नगरमधील प्रस्तावित स्मशानभूमीला राष्ट्रवादीचा विरोध.

सुंदर पारसिक नगरचे स्मशान होऊ देणार नाही- मिलींद पाटील

ठाणे (प्रतिनिधी)- पारसिक  नगरमधील नागरी वस्तीमध्ये स्मशानभूमी उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेने मांडला आहे. या प्रस्तावामुळे सुंदर अशा नागरी वस्तीच्या पारसिक नगरचे स्मशान करण्याचा डाव सेनेने आखला आहे. त्यांचा हा डाव आम्ही धुळीस मिळवू; प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल, पण पारसिक नगरात स्मशानभूमी होऊ देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी दिला आहे.

ठाणे महानगर पालिका आयुक्तांसोबत शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीमध्ये या पदाधिकार्‍यांनी पारसिक नगरमध्ये स्मशान उभारण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला आहे. पारसिक नगरमधील रहिवाशांना अंत्यसंस्कारासाठी खारीगावात जावे लागत असल्याने पारसिक नगरात स्मशान बांधावे, असे या प्रस्तावामध्ये म्हटले आहे. आधीच या नागरी वस्तीमध्ये एसटीपीचा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करुन पारसिक नगरसारख्या सुंदर वस्तीला नरक करण्याचा डाव आखला होता. आता नागरी वस्तीमध्येच स्मशान उभे करुन पारसिक नगरचे ‘ स्मशान’ करण्याचा कट सेनेने रचला आहे. त्यांचा हा कट आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. या स्मशानभूमीला आम्ही कडाडून विरोध करु; प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल. पण, पारसिक नगरवर अन्याय होऊ देणार नाही, असे मिलींद पाटील यांनी म्हटले आहे.

मिलींद पाटील यांनी या संदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांनाही पत्र दिले आहे. ‘ नागरी वस्तीमध्ये स्मशानाची उभारणी करणे, हे संकेत नाहीत. तसेच, धार्मिकदृष्टया देखील ते चुकीचे आहे. केवळ काही लोकांच्या हितासाठी ते असा प्रस्ताव मांडत आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळून लावावा, अशी मागणीही मिलींद पाटील यांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे.

4419 Views
Shares 41