Wed. Mar 29th, 2023

२० हजार घेताना मुंब्र्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका एसीबीच्या जाळ्यात.

ठाणे : प्रतिनिधी
ठाणे महानगर पालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या  नगरसेविका सुनिता पांडुरंग सातपुते यांना ठेकेदाराकडून  २० हजारांची लाच स्वीकारताना ठाणे एसीबीने रंगे हात पकडले आहे. ठेकेदाराच्या विरोधात सातपुते यांनी पालिका आयुक्त यांना अनधिकृत बांधकामाबाबत पत्र दिले होते. कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे.

मुंब्रा प्रभाग ३१ मधील ठाकूरपाडा परिसरात असलेल्या कविता अपार्टमेंट या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. इमारतीच्या लगत असलेल्या गटारात पिल्लर उभारून त्यावर बाल्कनी काढण्याचा प्रयत्न सुरु होता. याबाबत पालिका आयुक्त यांना सुनीता सातपुते यांनी २४ एप्रिल रोजी लेखी तक्रार केली होती. यावर कारवाई न करण्यासाठी सातपुते यांनी ५० हजाराची मागणी केली होती. गुरुवारी सकाळी २० हजारांचा पहिला हप्ता घेऊन ठेकेदार नगरसेविका सुनीता सातपुते यांच्या घरी गेला. दरम्यान  ठेकेदार यांच्याकडून २० हजाराची रक्कम घेताना सातपुतेंच्या घरीच त्यांना पकडण्यात आले. याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास उपाधीक्षक एसीबी अंजली आंधळे करत आहेत.

41159 Views
Shares 118