Wed. Mar 29th, 2023

स्वातंत्र्यातील पारतंत्रिय जीवन..

१५ ऑगस्ट १९४७ आपला स्वातंत्र्य दिन..या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आपली पारतंत्र्यातून सुटका झाली.. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला आहे आणि गेली कित्येक वर्षे आपण तो तसाच सोन्यासारखा साजरा करतो.. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे पूर्ण झाली.

या वर्षात भारताने उंचीची कितीतरी शिखरे गाठली, तंत्रज्ञानाने अवकाशात झेप घेतली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.. माणूस अगदी वेगाने प्रगती करतोय परंतु हे सर्व करत असताना माणसाच्या मनातल्या भावना, संवेदना तर लोप नाही ना पावल्या? प्रगतीच एक एक पाऊल पुढे टाकताना आपण मागे काय काय ठेऊन पुढे चालतोय याच भान देखील आता माणसाला उरलेलं दिसत नाही.. नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत असताना जगाच्या पाठीवर कुठेतरी वाईट विकृती देखील तेवढ्याच ताकदीने बळावतायत ह्या कडे आपलं दुर्लक्ष तर होत नाही ना याची एकदा तरी पडताळणी करून घ्यायला हवी अस वाटतय.. आज स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी खरच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? तर ह्याच उत्तर नाही असच वाटतय.. अगदी काही दिवसां पूर्वीची मन सुन्न करणारी घटना… एकतर्फी प्रेमाचा बळी ठरलेली महाविद्यालयीन शिक्षण घेणारी प्रियांका झाडे.. का तिचा जीव गेला ?

ऍसिड अटॅक झालेल्या असंख्य मुली, एकतर्फी प्रेमातून गेलेले निष्पाप जीव, हुंड्याचे बळी किंवा मग दिल्लीतील “निर्भया” असो अथवा इवलीशी “आसिफा”… ही सगळी कसली उदाहरण आहेत? स्वातंत्र्याची आहेत का? आपल्याच मातृभूमीत आपल्याच लेकीबळींची अशी का दशा? ह्याचा विचार का होत नाही किंवा ह्याचा विचार जेवढा व्हायला हवा होता तितका का होत नाहीये.. कामाच्या ठिकाणी, अगदी शाळा कॉलेजेस मध्ये देखील मुली सुरक्षित नाहीत इतकी दयनीय अवस्था का व्हावी ह्याला जबाबदार आपल्या सरकारचा नाकर्तेपणा, शिक्षेमध्ये कुठलाच कठोरपणा नाही ही सर्वात मोठी गोष्ट आहे, गुन्हेगाराला शिक्षा काय असते हे समजायच्या आधीच तो जामिनावर सुटून पुन्हा दुसरा गुन्हा करायला मोकळा झालेला असतो.. निदान स्त्रियांसाठी तरी इथे काहीच बदलेल दिसत नाहीत, नुसतं अस बोलून चालत नाही की, स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज काम करतेय, चूल आणि मूल एवढंच तीच आयुष्य मर्यादित राहिलेलं नसून तिने गगन भरारी घेतली पण ही गगन भरारी घेत असताना दुसरीकडे अशा घटनांनी तिचे पंख तर छाटले जात नाहीत ना? याची ह्या स्वातंत्र्यात दखल घेतली जावी हीच ह्या माय बाप सरकारकडे याचना.. स्वातंत्र्यातील हे पारतांत्रिय आयुष्य संपून एक नवीन मने उजळून टाकणारी सकाळ व्हावी ही मनोमनी सदिच्छा..

कस्तुरी सावंत यांचा विशेष लेख.

65648 Views
Shares 2