Mon. May 23rd, 2022

क्लस्टर उद्घाटनाचे फडणवीसांना निमंत्रण का नाही : निरंजन डावखरे

क्लस्टरची लगीनघाई का, भाजपचा शिवसेनेला सवाल.

ठाणे लाईव्ह :- ठाण्यातील महत्वपूर्ण क्लस्टर प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. त्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आभाराचे बॅनर लावून समाजमाध्यमांवर पोस्ट टाकल्या. मात्र, आता क्लस्टर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचेच फडणवीसांना निमंत्रण देण्यास शिवसेना का विसरली, असा सवाल भाजपाचे आमदार व ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आज येथे केला. आवश्यक मंजुरी मिळाली नसतानाही क्लस्टर उद्घाटनाची लगीनघाई का, असा सवालही डावखरे यांनी केला. तर क्लस्टर प्रकल्पावरुन नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होता कामा नये. अन्यथा, क्लस्टरची `एसआरए’ होईल, अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली.
ठाणे शहर अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांनी पहिल्यांदा पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते क्लस्टर प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन ते बोलत होते. या वेळी आमदार संजय केळकर, नगरसेवक संदीप लेले, कृष्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मढवी आदी उपस्थित होते.
क्लस्टरच्या मंजुरीवेळी शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे ठिकठिकाणी पोस्टर्स लावले होते. तसेच विद्यमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेत १८ सप्टेंबर २०१९ रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानणाऱ्या शिवसेना नेत्यांना आता क्लस्टर प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यास विसर का पडला, असा सवाल डावखरे यांनी केला. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस यांना बोलाविले पाहिजे. शिवसेनेला श्रेय घ्यायचे, तर त्यांनी घ्यावे. यापूर्वी महापालिकेच्या काही कार्यक्रमांना एक दिवस आधी मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आल्याच प्रकार घडलेला आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अजून तीन दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत शिवसेनेच्या नेत्यांना `सद्बुद्धी’ होईल, असा टोला डावखरे यांनी लगावला.
क्लस्टर प्रकल्पाच्या यूआरपीला (अर्बन रिन्यूअल प्लॅन) मंजुरी मिळालेली नसून, अद्यापी आयओडी (इंटिमेशन ऑफ डिसअॅप्रूव्हल) देण्यात आलेली नाही. त्यामुळे ई-भूमिपूजन करण्यासाठी लगीनघाई का केली जात आहे, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर गावठाणे व कोळीवाडे वगळण्याबाबात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करुन भूमिका जाहीर करावी, असे आवाहन डावखरे यांनी केले.
क्लस्टरबाबत सुस्पष्टता हवी. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होता कामा नये, अशी भू्मिका मांडत आ. डावखरे यांनी  ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर क्लस्टरबाबत कोणतीही माहिती नसल्याकडे लक्ष वेधले.
ठाण्यातील क्लस्टरचे देवेंद्र फडणवीस हे भाग्यविधाते आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेने सन्मानाने बोलवायला हवे. मात्र, शिवसेनेचा स्वभाव केले नसल्याचेही श्रेय घेण्याचा आहे. अन्, कोणी केले त्याला विसरुन जावे, असा आहे. त्यांच्यामुळे त्यांनी फडणवीसांना निमंत्रित केलेले नाही, असा टोला आमदार संजय केळकर यांनी मारला. क्लस्टरची अंमलबजावणी संपूर्ण पूर्तता करुनच करावी. अन्यथा, सोन्यासारख्या योजनेची एसआरए होईल, असे भाकीत केळकर यांनी केले. गावठाणे-कोळीवाड्याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. त्यामुळे सरकारने लेखी आश्वासने द्यावीत, अशी मागणीही केळकर यांनी केली.

42475 Views
Shares 0