Tue. Oct 26th, 2021

ऑनलाईन औषध विक्रीचा ‘बाजार’ बंद करा- मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे.

*ऑनलाईन औषध विक्रीचा ‘बाजार’ बंद करा*

– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलनाच्या ‘इंजेक्शन’चा इशारा

– नृत्यांगना, शरीरसौष्ठवपट्टुच्या मृत्यूनंतर वातावरण तापले

ठाणे, दि. १३ (प्रतिनिधी) – ऑनलाईन बाजारपेठांच्या जमान्यात कंपन्यांच्या सावळ्या गोंधळातून पेशाने नृत्यांगना व जिम ट्रेनर असलेल्या ठाण्यातील मेघना देवगडकर हिच्या दुर्देवी मृत्यूनंतर वातावरण तापले आहे. ऑनलाईन औषधांची विनापरवाना विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली असून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ऑनलाईन औषध विक्री कंपनीचा ‘बाजार’ तात्काळ बंद करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तसे न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचे ‘इंजेक्शन’ या कंपन्यांना टोचले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

मुंब्रा, उल्हासनगर तसेच विरारमध्ये स्टेरॉइड्स घेतल्याने जिममधील तीन तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असतानाच ठाण्यातही वजन कमी करण्याच्या गोळ्या खाल्याने मेघना देवगडकर (२२) हिचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला. ती पेशाने नृत्यांगना होती. तसेच जीममध्ये ट्रेनर म्हणूनही काम करायची. वजन कमी करण्यासाठी ज्या गोळ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली होती. त्याच गोळया मेघनाने घेतल्या. त्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या गोळ्या तिने ऑनलाईन मागवल्या होत्या. डिजिटल क्रांतीचा ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्या गैरफायदा घेत असून याबाबत कोणतीही नियमावली स्पष्ट नसताना त्यांच्याकडून या औषधांची विक्री केली जात आहे. १२ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्री करण्यास बंदी घातली होती. मात्र तरीही नियमांचे उल्लंघन करून ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांचे अँप बिनदिक्कतपणे स्टेरॉईड्स, गोळ्यांची विक्री करत आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. या कंपन्या आणि औषध विक्री करणाऱ्या अँपवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पाचंगे यांनी केली आहे.
००
* आणखी किती ‘मेघनांचा’ बळी घेणार?*
मुंबई पाठोपाठ ठाणे वेगाने वाढत आहे. त्यासोबतच येथे जिमची व जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या फिटनेसप्रेमींकडून अशा ऑनलाईन औषधांची खरेदी केल्यानंतर त्यांच्या जीवावर बेतते. अन्न व औषध प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आणखी किती मेघनांचा बळी घेतल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे.
– संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

16952 Views
Shares 0