का पडत चालले आहे शेयर मार्केट ? काही दिवसांमधेच का गमावले लोकानी करोडो रुपये ?

काही दिवसापासून स्टॉक मार्केट खूप आपटत आहेत, त्याला बरीचशी कारणे कारणीभूत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रुपयाची होणारी पडझड ! रुपया चे मूल्य भविष्यात सुद्धा कमी होत राहिला तर भविष्यात समभागांची विक्री करून त्या रुपयाला डॉलरमध्ये रूपांतरित केले तर कमी डॉलर भेटणार त्यामुळे अपेक्षित नफा होणार नाही किंवा तोटा होईल या भीतीने विदेशी गुंतवणूकदार संमभागांची विक्री करत आहेत.

अमेरिकेची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत असल्यामुळे त्यांना आता तिकडे गुंतवणूक केल्यास चांगले परतावे मिळतील म्हणून सुद्धा ते इथल्या समभागांची विक्री करत आहे.त्याचबरोबर मागच्या तीन वर्षांपासून शेअर मार्केट हे सतत वाढत आहे, शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे मागील तीन वर्षात आले होते, त्यामुळे उपलब्ध कंपन्यांची शेअर्सची खरेदी मोठ्या प्रमाणात केली गेली,शेअर्सची किंमत ही कंपनीने एका शेअर मागे किती रुपये कमावले याच्या प्रमाणात ठरत असते, कंपनीचा नफा तेवढाच असून सुद्धा शेअर मार्केटमध्ये नवीन येणाऱ्या पैशामुळे शेअरची किंमत वाढत राहिली, म्हणजे एक प्रकारचा फुगा तयार होत गेला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत याला आंतरराष्ट्रीय राजकारण कारणीभूत आहे,अमेरिकेने इराणवर घातलेल्या बंदीमुळे भारताला आता इतर राष्ट्रांकडून जास्त पैसे देऊन तेल घ्यावे लागणार! त्यामुळे भारताची वित्तीय तूट वाढू शकते त्याचा परिणाम सुद्धा शेअर मार्केटवर होत आहे.भारत हा मोठ्या प्रमाणात इंधन आयात करत असल्यामुळे आता महाग इंधन घ्यावे लागत असल्याने त्याचा ताण हा चालू खात्यावर येऊन स्थानिक बाजारात सुद्धा पेट्रोलच्या किमती वाढू लागल्या आहेत, त्यामुळे महागाई वाढू शकते व लोकांची खर्च करण्याची शक्ती कमी होऊन लोक बचतीकडे वळू शकतात.त्यामुळे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कमी होऊन मार्केटमध्ये मंदी येईल या भीतीने शेअर मार्केट पडत आहे, त्याचबरोबर महागाई वाढल्यामुळे बँकाना आरबीआयकडून कर्जाचे दर वाढवण्यासाठी निर्देश येऊ शकतात, त्यामुळे कंपन्यांना व्यवसाय विस्तार करण्यासाठी स्वस्त कर्ज मिळणार नाही किंवा खेळते भांडवलाची तूट निर्माण होईल येईल व त्याचा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होईल या भीतीने मार्केट पडत आहे, पण यातील प्रमुख कारण हा रुपयाची घसरण आहे.

रुपया घसरण्याची प्रमुख कारणे म्हणजे अमेरिकेने इतर राष्ट्रांवर लावलेली बंधने !अमेरिका मोठ्या प्रमाणात आपल्या आयातीवर कर लावून इतर राष्ट्रांच्या वस्तू आपल्या बाजारात येण्यापासून रोखत आहे. त्यामुळे जी राष्ट्रे अमेरिकेच्या निर्यातीवर अवलंबून आहेत त्यांना प्रचंड तोटा होत आहे. पण सरकार काही उपाय योजना करुन रुपया सावरण्याचे काम करू शकते.

त्यातील एक उपाय म्हणजे सोन्याच्या आयातीवर बंदी घालणे, त्याचबरोबर इतर लक्झरी गोष्टींच्या आयातीवर बंदी घालणे, त्यामुळे विनाकारण भारताचा पैसा हा विदेशात जाणार नाही. हया काय जीवनश्याक वस्तू नाही, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यासाठी विविध उपाय योजना करणे किंवा तात्पुरते इन्सेंटिव्ह देऊन विशेषतः निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,सध्या रुपया घसरल्यामुळे आयात महाग झाली आहे,त्यामुळे आपण स्थानिक उद्योगांना बळ देऊन त्या वस्तू या देशात स्वस्त बनवण्यासाठी उत्तेजन देऊ शकतो,आयात वस्तू आता स्थानिक वस्तूंपेक्षा महाग झाल्यामुळे स्थानिक उद्योगांना चांगले दिवस येऊ शकतात. कारण त्यांचा खप वाढू शकतो पण त्यासाठी सरकारने ताबडतोब उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणजे हे स्थानिक उद्योग आपल्या देशाला जेवढे उत्पादन लागते तेवढे पुरवून उरलेले उत्पादन निर्यात करू शकतात व त्यातून विदेशी चलन भारतात येऊ शकते. अशा वातावरणात स्टील, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स,केमिकल, कोळसा उद्योगांना फायदा होऊ शकतो.

यावर दुसरा उपाय म्हणजे सरकार विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून विदेशी चलन देशात आणू शकते,शेअर मार्केटमध्ये काही विदेशी गुंतवणूकदारांना व मोठ्या फंड हाऊस साठी किचकट नियम तयार करण्यात येत आहेत, त्यामुळे सुद्धा गुंतवणूक निघून जात आहे ते जर नियम शिथिल केले तर विदेशी गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये येण्यास मदत होईल,त्यामुळे डॉलरचा प्रवाह भारतीय मार्केटमध्ये वाढेल तेवढा रुपया मजबूत होण्यास मदत होईल, त्याचबरोबर सरकारने मसाला बोंड काढले आहेत ज्यामध्ये विदेशी गुंतवणूकदाराना डॉलरमध्ये पैसे गुंतवता येतात, त्यामध्ये सुद्धा शिथिलता आणणे गरजेचे आहे, त्याचबरोबर विविध उद्योगांमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल,चीनमध्ये गुंतवणुकीची संधी कमी झाल्यामुळे तेथील गुंतवणूकदार भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करू शकतात त्याचा भारताने लाभ घेतला पाहिजे त्याचबरोबर चीन आता विदेशी व्यापारामध्ये संघर्ष करत आहे, अशावेळी आपण चीनचे इतर देशांमधले मार्केट हस्तगत करू शकतो, इंधन आयातीवर उपाय म्हणून इथेनॉल,बायो ऑइल यांना प्रोत्साहन देऊ शकतो, त्यामुळे भारताचे कितीतरी डॉलर हे बाहेर जाण्या पासून रोखू शकतो.सरकारने आपले नियम व अटी तात्पुरते शिथिल करून जास्तीत जास्त विदेशी गुंतवणूक डॉलरच्या माध्यमातून भारतात आकर्षित करण्याची प्रयत्न करावा यामुळे डॉलरचा प्रवाह वाढून रुपयाला मागणी वाढेल व रुपया स्थिर होईल, त्याचा परिणाम चालू खात्यावर होऊन अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल, त्याचबरोबर पेट्रोलचे भाव सुद्धा थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल व याने अर्थव्यस्थेतील चक्र सुरळीत होऊ शकते.

 

लेखक : प्रशांत डावखर

804 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.