Wed. Mar 29th, 2023

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नगरसेवक देणार एक महिन्याचे मानधन.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नगरसेवक देणार एक महिन्याचे मानधन

ठाणे लाईव्ह :; राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी हातभार लावावा यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असून तसे पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त ‍विजय सिंघल यांना ‍दिले आहे.

संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव होत असून गेल्या काही दिवसात आपल्या राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करुन त्यांचे जीव वाचावे यासाठी शासनाच्यावतीने कठोर पावले उचलून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आपला सहभाग असावा यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यामध्ये ठाणे महापालिकेतील नगरसेवकांनी खारीचा वाटा उचलत आपले एक महिन्यांचे संपूर्ण मानधन देण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली. या अनुषंगाने महापौर नरेश म्हस्के यांनी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, शिवसेना गटनेते दिलीप बारट्क्के, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते नजीब मुल्ला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते यासिन कुरेशी व भाजपा गटनेते संजय वाघुले यांचेशी चर्चा करुन सर्व सदस्यांचे एक  महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून तसे पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनास दिले आहे. 

52996 Views
Shares 0