ठाणे महापालिकेच्या निवडणूका थेट सप्टेंबरमध्ये ?

ठाण्यात पुढील सहा महिन्यांसाठी प्रशासकीय राजवट लागणार…

मुंबई ठाण्यासह राज्यातील नऊ महापालिकांची मुदत मार्च मध्ये संपणार असून उल्हासनगर महापालिकेची मुदत एप्रिलमध्ये संपुष्टात येणार आहे.  ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महापालिककांवर सहा महिन्यांसाठी प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने निवडणुका सप्टेंबर पर्यंत पुढे जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

ठाणे महापालिकेची मुदत ५ मार्चला, नागपूर ४ मार्चला, मुंबई, सोलापूर ७ मार्चला, अकोला, अमरावती ८ मार्चला, पिंपरी-चिंचवड १३ मार्चला, पुणे आणि नाशिक १४ मार्चला, तर उल्हासनगर महापालिकेची मुदत चार एप्रिलला संपणार आहे.  तो पर्यंत सर्व महापालिकांच्या निवडणुका घेणे अशक्य असल्याने प्रशासकीय राजवट अटळ मानली जात आहे.

सध्याचे आयुक्त त्या-त्या महापालिकांवर सहा महिन्यांसाठी महापालिकेच्या मुदतीनुसार प्रशासक म्हणून नियुक्त केले जातील. मात्र, अपवाद म्हणून काहींच्या बदल्या होऊ शकतात. तर २० मार्च पर्यंत मुदत संपणाऱ्या २४ जिल्हा परिषदांवर प्रशासकीय राजवट येईल. याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्कामोर्तब होईल.महापालिका निवडणुकांच्या तारखांमध्ये  बदल होण्याची दाट शक्यता असल्याने या निर्णयाचा फटका नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार ,कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकासह अन्य नगरपालिका आणि भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदांना बसणार आहे.

1356 Views
Shares 0