
महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ गरजू महिलांनी व दिव्यांग बांधवांनी घ्यावा मा.महापौर नरेश म्हस्के यांचे आवाहन
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना तसेच दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी आर्थिक सहाय्य मिळावे तसेच रोजगारासाठीही मदत व्हावी यासाठी ठाणे महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, या योजनांचा गरजू महिलांनी तसेच दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ महिलांना घेता यावा यासाठी या योजनांबाबतच्या प्रस्तावास १८ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या योजनांची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी असे आदेश मा. महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले होते. या योजनांची जाहिरात प्रसिद्ध झाली असून ठाणे महानगरपालिका हद्दीतील गरजू महिलांनी आपले अर्ज १७ मार्च २०२२ पर्यत महापालिकेकडे सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनांमध्ये ‘कोविड १९ मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांना १ लाख रुपये आर्थिक सहाय्य करणे’, ‘कोविड १९ मध्ये एक पालक गमावलेल्या ० ते १८ वर्षापर्यतच्या बालकांना ५० हजार रुपये आर्थिक सहाय्य करणे’, ‘आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विधवा घटस्फोटित महिलांच्या मुलीच्या विवाहाकरिता २५ हजार रुपये अनुदान देणारी कन्यादान योजना’, ‘मुलगी जन्माला आल्यावर तिच्या सर्वागीण विकासासाठी १५ हजार रुपये आर्थिक मदत देणारी राजकन्या योजना’, ‘ठा.म.पा क्षेत्रातील पहिल्या मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या अथवा पहिली मुलगी असताना दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस २५ हजार रुपये अर्थसहाय्य करणे’, ‘ठा.म.पा क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिलांना (एचआयव्हीग्रस्त, कॅन्सरग्रस्त, अर्धांगवायू, डायलेसीस इ. सारखे ) उदरनिवार्हासाठी २५ हजार रुपये अर्थसहाय्य करणारी नवसंजीवनी योजना’, ‘जिजामाता/जिजाऊ महिला आधार योजनेतंर्गत २५ हजार रुपये अनुदान देणे (कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास एक रकमी अनुदान देणे)’, ‘किमान ३ वर्षे पुर्ण झालेल्या नोंदणीकृत बचतगटांना १० हजार रुपये फिरता निधी उपलब्ध करुन देणे’, ‘६० वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या विधवा /घटस्फोटीत महिलांच्या उदरनिर्वाहासाठी १२ हजार रुपये अनुदान देणे’, ‘महिलांसाठी गुडघे प्रत्यारोपण शस्त्क्रियेसाठी ५० हजार रुपये अनुदान देणे’, ‘रिक्षाचालक महिलांसाठी १० हजार रुपये अर्थसहाय्य देणे’, ‘तृतीयपंथी व्यक्तीनां उदरनिर्वाहासाठी १८ हजार २५० रुपये अनुदान देणे’ यांचा समावेश आहे.
तसेच दिव्यांग व्यक्तिंसाठी उत्पन्नाच्या अटीवर घरकुलामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग व्यक्तीला उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग व्यक्तींना औषधोपचारासाठी आलेल्या खर्चाच्या 50 टक्के निधी उपलब्ध करून देणे, दिव्यांग बेरोजगार व्यक्तींना भत्ता देणे तसेच त्यांच्या लग्नासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, 60 वर्षावरील दिव्यांग व्यक्तीला जगण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देणे, दिव्यांग व्यक्तीच्या बचत गटांसाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देणे तसेच कुष्ठरोगी दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य करणे या योजनांचा समावेश आहे.
या सर्व योजनांचे अर्ज ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागसमिती कार्यालयात (सुट्टीच्या दिवशीही) उपलब्ध करण्यात आले असून आवश्यक त्या कागदपत्रास पूर्ण माहिती भरलेले अर्ज दिनांक १७ मार्चपर्यत जमा करावेत. तरी गरजू महिलांनी व दिव्यांग व्यक्तींनी ही या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.


More Stories
ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट, 4 जण गंभीर जखमी
कोकणासह ठाणे, मुंबईत ढगाळ वातावरण
आरसीबीची टीम ठाण्यात दाखल; आयपीएल पूर्व तयारीच्या सरावसत्रला सुरवात