‘चांगले काम करुन लोकांच्या हृदयात जागा निर्माण करा’ – डॉ. जितेंद्र आव्हाड

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हे जनसेवेसाठी समर्पित आहेत. सर्वच नगरसेवक कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक आहेत. या सर्व नगरसेवकांना माझे एकच सांगणे आहे की, चांगले काम करा आणि लोकांच्या हृदयात जागा निर्माण करा. एकदा लोकांच्या हृदयात जागा निर्माण झाली की कोणीही आपणाला दूर करु शकत नाही’, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.

कळवा येथे स्व. मुकूंद केणी क्रीडा संकुलाचे डॉ. आव्हाड यांच्या हस्ते दिमाखदार लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, मा. महापौर मनोहर साळवी, मा. विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, मा. विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, नगरसेवक सुहास देसाई, अपर्णा साळवी, महेश साळवी, मिलींद साळवी, जितेंद्र पाटील,  प्रकाश बर्डे, अनिता गौरी,  प्रकाश पाटील, गजानन चौधरी, प्रभाकर सावंत, गजानन चौधरी, मनाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. आव्हाड म्हणाले की, हा भूखंड सर्वात आधी आपण पाहिला होता. एकीकडे असे मोकळे भूखंड शिल्लक रहात नसतानाही स्व. मुकूंद केणी यांनी ह्या भूखंडावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी दाखविलेले हे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. मुकूंद केणी यांनी या क्रीडा संकुलाची सुरुवात केली होती. त्यांचे हे स्वप्न मंदार केणी यांनी पूर्ण केले आहे.  या क्रीडा संकुलासारखे दुसरे क्रीडा संकुल सबंध ठाणे शहरात दुसरे नाही. राष्ट्रवादीचे नगरसेवक समर्पित भावनेने काम करीत असल्यानेच आपण कळवा- मुंब्रा बदलतोय, असे म्हणत आहोत. राष्ट्रवादीचे नगरसेवक माणसांची सेवा करीत आहेत; कदाचित माझ्याकडून ही सेवा अखंडित सुरु रहावी, यासाठीच कोविड झाल्यानंतरही देवाने आपणाला परत पाठवले, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले.

यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मा. विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी हे क्रीडा संकुल उभारण्यात सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार मानले. दरम्यान, सबंध ठाणे महानगरपालिका हद्दीमधील हे एकमेव अद्ययावत क्रीडा संकुल आहे. या क्रीडा संकुलामध्ये फुटबॉल, क्रिकेट, कब्बडी यांचे टर्फ, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जीम अशा सर्व सुविधा आहेत.

‘मंदारच्या रुपाने केणी कुुटुंबाला कर्तृत्वान मुलगा लाभला’- डॉ. आव्हाड

मुकूंद केणी यांच्या जाण्याने केणी कुटुंबांचीच नव्हे तर कळवेकरांची प्रचंड हानी झाली. अशा प्रतिकूल स्थितीमध्येही मंदार केणी यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. सर्वांशी मधुर सबंध असल्याने त्यांचे हे काम रखडले नाही. केणी कुटुंबाला मंदारच्या रुपाने कर्तृत्ववान मुलगा लाभला आहे. उत्कृष्ठ व्यावसायिक असतानाही मंदार लोकांची खूप सेवा करतोय. म्हणूनच त्याला कधीच काही कमी पडणार नाही. प्रमिलाताई या भाग्यवान आहेत. कारण, त्यांच्या पतीचे विश्व मंदार 10 पटीने वाढवित आहे, अशा शब्दात डॉ. आव्हाड यांनी मंदार केणी यांचा यावेळी गौरव केला.

436 Views
Shares 0