
ठाणेकरांच्या पाणी टंचाई समस्येवर पर्याय; भातसा धरणाचा दरवाजा दुरुस्त होईपर्यंत पर्यायी दरवाजातून कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे.
भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणी पुरवठा होत असल्याने आठवडाभरापासून शहरातील घोडबंदर, वर्तकनगर भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाने भातसा धरणाच्या बिघडलेल्या दरवाजाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी दुसऱ्या दरवाजातून कालव्यात पाणी सोडण्यास सूरुवात केली असून यामुळे ठाणेकरांना ५० टक्केऐवजी केवळ १० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठ्यात वाढ झाल्याने ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतामार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी २०० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून करण्यात येतो. त्यासाठी महापालिका भातसा धरणाच्या पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते. भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ठाणे महापालिकेच्या योजनेतून शहराला ५० टक्के कमी पाणी पुरवठा होत आहे. दररोज दोनशेऐवजी शंभर दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असल्यामुळे ठाणेकरांचे गेल्या आठवडाभरापासून हाल सुरु आहेत. शहरातील घोडबंदर, वर्तकनगर भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. घोडबंदर भागातील अनेक उच्चभ्रू संकुलातील रहिवाशी तीन ते चार हजार रुपये खर्च करून पाण्याचे टँकर मागवित आहेत. ऐन उन्हाळ्यात पाण्याविना ठाणेकरांचे हाल सुरु आहेत. ही बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने भातसा धरणाच्या बिघडलेल्या दरवाजाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी दुसऱ्या दरवाजातून कालव्यात पाणी सोडण्यास सूरुवात केली आहे. यामुळे पिसे बंधाऱ्यातून दररोज ९० टक्के म्हणजेच १८० दशलक्षलीटर इतके पाणी उचलणे पालिकेला शक्य होत आहे. दरम्यान, दरवाजा दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर सुरु असून ते काम होताच पालिकेला पुर्वीप्रमाणेच २०० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती महापालिकेचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
विभागवार नियोजन रद्द –
पाणी टंचाईची झळ कमी व्हावी यासाठी महापालिकेने उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे विभागावार नवे नियोजन करून ठाणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पिसे बंधाऱ्यातून १८० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असल्यामुळे पालिकेने नियोजन रद्द करून पुर्वीप्रमाणेचे पाणी पुरवठा सुरु ठेवण्यास सुरुवात केली आहे, असे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी सांगितले.