Sun. Dec 4th, 2022

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने विधिमंडळाच्या आवारात जागतिक महिला दिन साजरा.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने विधिमंडळाच्या आवारात जागतिक महिला दिन साजरा.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने एक आगळा वेगळा महिला दिन साजरा करण्यात आला. विधीमंडळाच्या आवारात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांना शिवसेनेच्या महिला आमदारांच्या हस्ते केक भरवून आणि खास भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारांसोबतही हा दिवस साजरा करण्यात आला.

जगभर 8 मार्चचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस अनेक महिला वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असताना मुंबई पोलिसातील महिला पोलीस मात्र आजही आपली कर्तव्यभावना जागी ठेवून कर्तव्य निभावत आहेत. महिला पोलिसांच्या कर्तव्यभावनेचा सन्मान करण्यासाठी शिवसेनेच्या महिला आमदार मंजुळाताई गावित आणि लता सोनावणे यांच्याहस्ते एक फुल आणि छोटी भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या महिला दिनाच्या सोहळ्याने भारावलेल्या महिला पोलिसांनी शिवसेनेच्या आमदारांसह केकही कापला. यावेळी त्यांनी खास विनंती केल्याने या महिला भगिनींच्या सन्मानार्थ त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेल्फीही काढला.
यानंतर विधिमंडळाच्या आवारात अधिवेशन काळात काम करणाऱ्या महिला पत्रकारांसोबतही केक कापून तसेच त्यांना भेटवस्तू देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

‘पोलीस महिला भगिनी या सदैव आपली कर्तव्यभावना प्रमाण मानून काम करत असतात. कोरोना काळात देखील त्यांनी केलेले काम उल्लेखनीय होते. त्यावेळी प्रसंगी लोकांना अन्न देण्यासाठी ते बनवण्यासाठी मदत करताना देखील मी महिला पोलिसांना पहिले होते. त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कामाचे तास आठ तासांवर आणले आहेत. सध्या हा निर्णय फक्त पोलीस अंमलदाराना लागू होत असला तरीही तो इतर पोलीसाना लागू करण्याचा देखील नक्की प्रयत्न करू’ असेही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी शिवसेनेच्या महिला आमदार मंजुळाताई गावित, आमदार लताताई सोनावणे, आमदार सुनील प्रभू, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार डॉ. बालाजी किणीकर, पोलीस उपायुक्त संजय पाटील, वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील, सायन विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी शेलार, विमानतळ विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर आणि पोलीस भगिनी उपस्थित होत्या.

 

 

172 Views
Shares 0