आता भिवंडीतील रस्त्यांची सफाई करणार रोड स्वीपिंग यंत्र !

भिवंडी महापालिका क्षेत्रात धुळीने आणि कचऱ्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भिवंडी महापालिकेने काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, उड्डाणपुलांवरील झाडलोट करण्यासाठी अत्याधुनिक रोड स्वीपिंग यंत्र आणले आहे. अवघ्या १० ते १५ मिनीटात हे एक ते दीड किलोमीटपर्यंतचा रस्ता हे यंत्र स्वच्छ करत आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात मेट्रो निर्माणाची कामे तसेच शहरातील अंतर्गत भागात सुरू असलेल्या विविध बांधकामांमुळे परिसरातील रस्त्यांवर धूळ साचलेली असते. तसेच वाहनांतून जाताना अनेकदा प्रवासी किंवा वाहन चालक खाद्य पदार्थाचे वेष्टण, घरातील कचरा वाहनांबाहेर फेकून देत असतात. शहरातील बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात कचरा साठविला जातो. भाजी बाजारपेठांमध्ये होणारा कचरा अनेकदा सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छ करणे कठीण जात असते. तसेच अनेकदा उड्डाणपुलांवरही मोठय़ाप्रमाणात कचरा असतो. हा कचराही साफ करता येत नाही. त्यामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात धुळीकण निर्माण होऊन प्रदुषणाची समस्या निर्माण होते. याचा थेट परिणाम भिवंडीतील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी भिवंडी महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर ‘रोड स्वीपिंग यंत्रा’द्वारे शहरातील कचरा समस्या दूर करण्यास सुरुवात केली आहे. हे यंत्र अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये दीड ते दोन किलोमीटर पर्यंतचा कचरा स्वच्छ करू शकतो. तसेच यंत्रामुळे मनुष्यबळाचा वापरही कमी करावा लागत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

छोट्या कार प्रमाणे हे वाहन चालविले जाते. या वाहनाच्या खालील बाजूस झाडू सारखे यंत्र बसविलेले असते. रस्त्यारील धूळ तसेच इतर कचरा साफ करून ते यांत्रिक पद्धतीने यंत्रामध्ये साठविले जाते. त्यानंतर साठवलेला कचरा कचराभूमीमध्ये नेऊन टाकला जातो. भिवंडी महापालिका क्षेत्रात या यंत्राचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू आहे. या यंत्रामुळे उड्डाणपुलांवरील कचरा सहज स्वच्छ करणे शक्य होत आहे.– सुधाकर देशमुख, आयुक्त, भिवंडी महापालिका

1491 Views
Shares 0