Wed. Mar 29th, 2023

“सावध शोध, सावध शोध आहे विष तयार, जातीच्या तलवारींचा आता थेट मेंदूत वार”- असं का म्हणाले विजू माने ?

मेंदूला लागलेल्या जातीवादाच्या विषाचे ऍंटीडोट असणारी विजू माने यांची ही कविता तुम्ही एकदा, नक्कीच ऐका !

 

मंडळी ‘चित्रपट’ म्हणजे करमणुकीचा एक भाग, चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करून अनेक गोष्टींचं ज्ञान, विविध विचार, प्रश्न, समस्या लोकांपुढे मांडल्या जातात. एखाद्या चित्रपटातून केवळ मनोरंजन होते तर एखादा चित्रपट आपल्याला खूप काही शिकवून जातो, एखादा चित्रपट आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं देतो, तर एखादा चित्रपट आपल्यला एखाद्या प्रश्नांवर विचार करायला भाग पडून जातो. एखाद्याने चित्रपट ज्या अर्थाने बनवला, त्या अर्थानेच प्रेक्षकाला तो समजला आणि त्यातून समाजात काही चांगला बदल झाला, तर त्या चित्रपटला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो. पण चित्रपटातील मतितार्थ दुर्लक्षित करून केवळ तो चित्रपट कोणी बनवला, कोणत्या जाती-धर्मातील लोकांवर बनवला, यावरून जर एखाद्या चित्रपटाची तुलना दुसऱ्या चित्रपटाशी केली जाणार असेल आणि त्यावरून समजतील प्रेक्षकवर्ग गटांमध्ये वाटला जाणार असेल तर ही बाब चित्रपटसृष्टी सोबतच समाजासाठी सुद्धा तितकीच हानिकारक आहे.

आज पावनखिंड, झुंड आणि द काश्मीर फाईल्स हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. हे तिन्ही चित्रपट आपापल्यापरीने तीन वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडतात. पावनखिंड सारखा चित्रपट आपल्याला आपल्या सुवर्ण इतिहासाची ओळख करून देतो, तर झुंड समाजातील विषमतेचे भान करून देतो, तर काश्मीर फाईल्स सारखा चित्रपट नरसंहराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा आपल्या समोर मांडतो. तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करतात आणि तिन्ही चित्रपटात जो-तो मुद्दा, विचार अगदी स्पष्ट आणि उत्तम पद्धतीने मांडला आणि सादर केला गेला आहे. तरीही समाजातील काही लोक या उत्तम कलाकृतींना जाती-धर्म-गटात वाटू पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रपटाची संकल्पना, निर्मिती हे निकष दूर लोटून केवळ जाती-धर्म-गट यांवरून या चित्रपटांची तुलना करण्याची कपटी खेळी काही समाजकंटकांकडून खेळली जात आहे. चित्रपटांच्या माध्यमातून हे विष आता लोकांच्या डोक्यात पेरलं जात आहे. ज्यामुळे प्रेक्षक वर्ग बाधित होऊन तुकड्या तुकड्यात विखुरला जात आहे. आणि ही गोष्ट आधी चित्रपटसृष्टीसाठी आणि कालांतराने संपूर्ण समाजासाठी अत्यंत घातक ठरणार आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डल वरून “सावध शोध, सावध शोध आहे विष तयार, जातीच्या तलवारींचा आता थेट मेंदूत वार !”  असं म्हणत एक कविता शेयर केली आहे. ज्यात त्यांनी, “कुठे चाललो आहोत आपण ? पावनखिंड विरुध्द झुंड विरुध्द काश्मीर फाईल्स ? ही कुठली विद्वेषाची लढाई लढता आहात? काय साध्य होणार आहे ह्याने? मी स्वतःला उजवा, डावा, पुरोगामी वगैरे मानत नाही. मी माणूस म्हणून जगण्याला प्राधान्य देणारा आहे. एक सिनेमा बनतो त्यावर अमुक एका जातीचा शिक्का लावण्यापेक्षा सिनेमा म्हणून का पाहिलं जात नाहीय ? सिनेमा म्हणून जर आवडला नाही तर तो प्रत्येकाच्या आवडी निवडीचा भाग आहे असं समजून त्यांच्या मताचा आदर का केला जात नाही ?” असे प्रश्न समस्त प्रेक्षक वर्गाला विचारले आहेत. सोबतच समाजात चित्रपटाच्या बाणाला जातीवादाचे विष लावणाऱ्यांना सुद्धा विजू माने यांनी खडे बोल सुनावले आहेत.

तर, ‘आपापल्या सोशल माध्यमातून जाती धर्माला फाटा देऊन, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण इत्यादी मूळ विषयांवर बोलत जाऊयात. तेही शक्य नसेल तर जाती धर्माच्या विखारी पोस्ट पासून स्वतःला आणि ज्यांची काळजी वाटते अशांना लांब ठेवूयात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले (ह्यात कुणाचंतरी नाव नाही म्हणून भांडू नका, त्या नावाचे विचार पसरवा) यांना वाटून घेण्यापेक्षा यांचे विचार वाटून घेऊयात.‘ असं आवाहनही विजू माने यांनी या पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.

चित्रपटांतून मनोरंजनाद्वारे अनेक सामाजिक संदेश देण्याच्या प्रामाणिक प्रयत्न अनेक निर्माते सतत करत असतात. आपल्या कला-कौशल्याचा कस लावून नवनवीन कलाकृती आपल्या समोर मांडत असतात. पण त्यातून काय संदेश घ्यायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण एखाद्या कलाकृतीची तुलना जाती धर्मावरून होऊ नये आणि त्या कलाकृतीला योग्य न्याय मिळवा असा प्रयत्न आपल्या सर्वांकडून व्हायला पाहिजे.

मेंदूला लागलेल्या जातीवादाच्या विषाचे ऍंटीडोट असणारी विजू माने यांची ही कविता तुम्ही एकदा, नक्कीच ऐका !

 

1212 Views
Shares 0