पालघरमधील शेतकरी निघाले इस्राईलला.. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा स्तुत्य उपक्रम.

पालघरमधील शेतकऱ्यांचे इस्राईलकरिता ‘टेकऑफ’
– आधुनिक शेतीचे तंत्र – मंत्र शिकणार
– जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा स्तुत्य उपक्रम
ठाणे,  (प्रतिनिधी)

विचित्र निसर्गचक्रामुळे उद्धवस्त झालेल्या ठाणे – पालघर जिल्ह्यातील बळीराजाच्या मदतीला ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धावून आली असून शास्त्रोक्त शेतीचे धडे गिरवणाऱ्या इस्राईलची ५८ शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून सफर घडवली जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीत या शेतकऱ्यांचे विमान ‘इस्राईल’ला टेकऑफ घेणार असून शेतीतील नव्या प्रयोगचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे.

राज्यातील सहकार क्षेत्रात नवनवीन प्रयोगांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चार ते पाच वर्षांपासून ठाणे – पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक व प्रगत शेतीचे धडे गिरवण्यासाठी इस्राईलला नेण्याची मागणी सभासदांकडून केली जात होती. त्यानुसार यंदा सहकार आयुक्तांकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला. त्याला नुकताच हिरवा कंदील मिळाला असून ५८ शेतकरी, बँकेचे १९ संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे दोन अधिकारी इस्राईलला रवाना होणार आहेत. शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी परदेश दौऱ्यावर नेणारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील पहिलीच बँक असून पासपोर्ट व इतर कागदपत्रांची पूर्तता होताच इस्राईलकडे शेतकऱ्यांचे विमान ‘टेकऑफ’ घेणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. बँकेच्या मोबाईल अँपचे आज पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, ठाणे पालिका नगरसेवक, संचालक बाबाजी पाटील, सीईओ भगीरथ भोईर, नाबार्डचे प्रबंधक आर. जी. चौधरी, सुधाकर रघतवान, डीडीएम पडघम उपस्थित होते.
००
* कुक्कटपालन ते फुलशेती
दुष्काळावर मात करून कमी पावसात शेती करण्यासोबतच कुक्कटपालन, वराहपालन, फळ लागवड, फुल शेती, दुग्ध व्यवसाय आदींचे प्रशिक्षण इस्राईल दौऱ्यात दिले जाणार असून शास्त्रोक्त पद्धतीने प्रगत तंत्रज्ञान वापरून शेतीसोबत जोडधंदा करण्याचे तंत्र ठाणे – पालघरमधील शेतकरी आत्मसात करणार आहेत.

* महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा पाठपुरावा
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इस्राईल दौऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने विशेष पाठपुरावा केला असून त्यामुळेच राज्यातील १४ जिल्हा बँकेमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला या दौऱ्याचा बहुमान मिळाल्याचे बँकेचे उपाध्यक्ष, संघाचे संचालक भाऊ कुऱ्हाडे यांनी सांगितले.

298 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.