आरोग्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे लवकरच ठाणेकरांना देणार मोठी भेट.

 

मुंबई : आरोग्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कॅन्सरवरील उपचारासाठी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे केंद्र ठाण्यात उभारावे, यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पावलं टाकली आहेत. शिवाय, सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी सुविधा सुरु करावी, असे आवाहनही एकनाथ शिंदेंनी केले आहे. तसेच, आरोग्य विभागातील रिक्त पदे विहित कालमर्यादेत भरण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन विभागाच्या कामाचा आढावा घेतला.

ठाण्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं केंद्र
कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून केमोथेरपी उपचाराची सुविधा जिल्हा रुग्णालयात मिळावी यासाठी सर्वच जिल्हा रुग्णालयात याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी होते, ती कमी करण्यासाठी ठाणे येथे टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी महापालिका जागा देण्यासही तयार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील रिक्त पदं तातडीने भरणार

आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत आरोग्यमंत्री म्हणाले, सामान्य नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. विविध संवर्गातील 15 हजार पदे रिक्त आहेत ती विहित कालमर्यादेत भरण्यात यावी. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना चांगल्या सेवा सुविधा दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

2,317 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.