नवी मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता,नालेसफाईचे काम अर्धवट.

ठाणे लाईव्ह -प्रतिनिधी

मागील वर्षी सिडको वसाहतीसह पनवेल महानगरपालिका क्षेत्रात तुंबलेल्या पाणी ठिकाणांत पुन्हा एकदा पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा ठिकाणांची साफसफाई योग्यरीत्या झाली नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सायन-पनवेल महामार्गाचाही समावेश असून प्रशासनाच्या निष्काळजीविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, करंजाडे तसेच पनवेल शहराचा यामध्ये समावेश आहे. पाणी तुंबण्याचा धोका लक्षात घेता दोन्ही प्रशासनामार्फत नाले, गटार आदीची कामे हाती घेण्यात आली. मात्र, यामधील महत्त्वाची समस्या संबंधित कंत्राटदारांना अपयश प्राप्त झाले आहे. सध्याच्या घडीला नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. मात्र नाले, गटार आदीमधील गाळ बाहेर काढले जात नसल्याने पुन्हा एकदा शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पाणी पोहोचण्याचा धोका कायम आहे. नुकतीच पावसाला सुरु वात झाली आहे.
मात्र, काही ठिकाणच्या अपुऱ्या कामांमुळे पावसाचे पाणी साचण्यास सुरु वात झाली आहे. खारघर रेल्वेस्थानक, कळंबोली उड्डाणपुलाखाली, कळंबोली डेपो परिसर, कळंबोली उड्डाणपुलाजवळील नाला, खारघर टोलनाका, एमजीएम जंक्शन, खांदा कॉलनी उड्डाणपूल, कामोठे शहरातील स्टेशन परिसर, बांठिया स्कूल नवीन पनवेल, पनवेल शहरातील कफनगर, कोळीवाडा, तालुका पोलीस स्टेशन रोड आदी ठिकाणी पावसाळ्यात नियमित पाणी साचते. पावसाळ्यात नाल्यांची सफाई होते. मात्र, त्यामधील गाळ काढला जात नसल्याने नियमित पाणी तुंबण्याचा प्रकार वाढत आहे. सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली स्थानकाजवळ जवाहर इंडस्ट्रीमधील पाण्याचा निचरा योग्यरीत्या होत नसल्याने येथील पाणी महामार्गावर साचत आहे. या ठिकाणच्या नाल्याच्या कमी आकारामुळे ही समस्या उद्भवली आहे.

उरण फाटा या ठिकाणीही हीच अवस्था आहे. या मार्गालगत असलेल्या डोंगरावरील पाणी मोठ्या प्रमाणात मार्गावर दरवर्षी येते. यामुळे संपूर्ण मार्ग पाण्याखाली जात असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होतो. हेच मार्ग मोठ्या प्रमाणात धोकादायक झाले आहेत.

124 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.