विद्याविहार येथून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना अटक.

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विद्याविहार परिसरातून पोलिसांनी कृष्ण जी. दुपारे (वय 53) या तस्कराला ताब्यात घेतलं. घाटकोपरमध्ये व्हेल माशाच्या  उलटीची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी आणि वन विभागाने संयुक्तरित्या कारवाई करत या तस्कराला रंगेहात अटक केली. या तस्कराकडून पोलिसांनी 1 किलो 130 ग्राम वजनाची उलटी जप्त केली. परदेशी बाजारात याची किंमत जवळपास 1 कोटी 70 लाख रुपये आहे.

पोलिसांनी कृष्ण जी. दुपारेला न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने दुपारेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर दुपारे याच्या माहितीवरुन पोलिसांनी त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक केली. सध्या पोलीस या दोघांचीही कसून चौकशी करत आहेत. तसेच, व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीमागे कुठला मोठा रॅकेट तर नाही ना याचाही तपास सुरु आहे.

व्‍हेल माशाची उलटी जेव्हा घनरुप घेते तेव्हा त्यापासून एक विशिष्ट प्रकारचा दगड तयार होतो. या दगडाला परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याला समुद्रात तरंगणारं सोनंही म्हटलं जातं. या दगडापासून मोठ्या ब्रॅण्डचे परफ्यूम तयार केले जातात. गेल्या काही वर्षांपासून कोकण किनाऱ्यावर व्हेल मासा दिसू लागला आहे. त्यानंतर येथे या व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी करणारी टोळकीही मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली. व्हेल माशाच्या उलटीपासून तयार झालेला हा दगड शोधण्यासाठी महिनाभर तर कधी वर्षभराचा कालावधीही लागतो. नुकतंच व्हेल माशाच्या उलटीपासून तयार झालेला 11 किलोचा दगड तस्करांच्या हाती लागला. परदेशी बाजारात याची किंमत जवळपास 22 कोटी रुपये इतकी आहे.

व्हेल मासा हा समुद्रात खूप खोलवर असतो. त्यामुळे त्याची उलटी किनाऱ्यापर्यंत यायला बराच वेळ लागतो. सूर्य प्रकाश आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्याने हे द्रव्य घनरुप घेतं. हे दिसायला एखाद्या दगडाप्रमाणे दिसतं. सुरुवातीला या उलटीचा मलप्रमाणे वास येतो. मात्र, काही वर्षांनंतर यातून सुगंध येऊ लागतो. याचा सुगंध बराच वेळ राहातो. याचा उपयोग परफ्यूम बनवण्यात केला जातो. म्हणून परदेशी बाजारात याला मोठी मागणी आहे. एम्बरग्रीसला तरंगणारं सोनंही म्हटलं जातं. एम्बरग्रीस हे साधारणपणे परफ्यूम तसेच इतर सुगंधित वस्तू तयार करण्यासाठी वापरलं जातं. एम्बरग्रीसने तयार झालेलं परफ्यूम अनेक देशांमध्ये मिळतं. प्राचीन मिस्त्रमध्ये यापासून सुगंधित अगरबत्ती आणि धूप बनवलं जात होतं. आधुनिक मिस्रमध्ये यापासून सिगारेटला सुगंधित बनवलं जातं. प्राचीन चीनी लोक या पदार्थाला ‘ड्रॅगनने थुंकलेला सुगंध’ असं म्हणतात.

या पदार्थाचा उपयोग जेवणाची चव वाढवण्यासाठी, तसेच काही देशांमध्ये लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही केला जातो. मध्य युगात यूरोपीय लोक डोकेदुखी, सर्दी, फीट आणि इतर काही आजारांवर उपाय म्हणूनही या पदार्थाचा वापर करत असत.

154 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.