ठाण्यातील भाजपचे नगरसेवक ब्लॅकमेलर – ठामपा आयुक्त.

महासभेवर टाकला बहिष्कार.

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी

प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांपैकी कोणाला वाढीव कालावधी दिला, असा सवाल उपस्थित करणा-या भाजपच्या नगरसेवकांचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी महासभेत चांगलेच कान टोचले. ब्लॅकमेलिंग करून उद्देश साध्य करण्याऐवजी नैतिक मार्गाने उन्नती साधा, असे खडेबोल ‘पार्टी विथ डिफरन्स’ असलेल्या भाजपच्या नगरसेवकांना सुनावले. आयुक्तांची बोलणी चांगलीच झोंबल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे आयुक्तांनीही सर्वच अधिकाऱ्यांना घेऊन महासभेवरच बहिष्कार टाकला.शुक्रवारी महासभा सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाºयांचा कालावधी संपल्यानंतरही कोणाला वाढीव मुदतवाढ दिली, असा सवाल केला. यावर प्रशासनाच्या वतीने वर्षा दीक्षित यांनी उत्तर दिले. परंतु, त्यावर त्यांचे समाधान झाले नाही. उलट, माझा प्रश्न तुम्हाला समजलाच नाही, असे त्यांनी सांगितले.

अखेर, आयुक्त जयस्वाल यांनी पाटील यांचा प्रश्न वाचून एकाच अधिकाऱ्याला मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले. परंतु, यावरही समाधान न झाल्याने माझा प्रश्न व्यवस्थित वाचा, एकच अधिकारी आहे का? आणखी काही अधिकारी आहेत, असा उलट सवाल केला. त्यानंतरही आयुक्तांनी तेच उत्तर दिले. त्यावर तुम्ही दिलेले उत्तर चुकीचे असल्याचा दावा पाटील यांनी केला. त्यानंतर मात्र आयुक्तांचा पारा अनावर झाला. त्यांनी तुमचा प्रश्न काय आहे, हे मला समजले आहे आणि असे तुम्ही का विचारत आहात, त्यामागचा तुमचा हेतूही मला माहीत असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले. परंतु, त्यानंतरही ते आपल्या प्रश्नावर अडून राहिले. त्यामुळे आयुक्तांचा राग अनावर होऊन त्यांनी तुमचा हेतू ब्लकमेलिंगचा वाटत असल्याचे सांगून अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करून आपला उद्देश साध्य करण्यापेक्षा नैतिक मार्गाने उन्नती साधा, असा सल्ला दिला. हे उत्तर चांगलेच झोंबल्याने भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आयुक्तांनी अशा भरसभागृहात नगरसेवकाला असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगून गटनेते नारायण पवार यांनी आयुक्तांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. यावर आयुक्तांनीही संतापून आधी तुम्ही माफी मागा, असा सूर लावून अधिकाऱ्यांना घेऊन महासभेवरच बहिष्कार टाकला.

1,635 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.