ठाण्यात प्रशासनाची हिटलरशाही!! सोयीचे प्रस्ताव मंजूर न झाल्याने अधिकाऱ्यांनीच टाकला महासभेवर बहिष्कार.

आयुक्तांच्या विरोधातही अविश्वासाचा ठराव.

ठाणे लाईव्ह :- पालिकेच्या महासभेत प्रशासनाने काल अक्षरशः हिटलरशाही केली. प्रशासनाच्या सोयीचे ठराव मंजूर न केल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी करीत अधिकाऱ्यांसह महासभेवर बहिष्कार घातला.
त्यामुळे प्रशासनाचा एकमुखी निषेध करीत महासभा तहकूब करण्यात आली. नगरसेवक एवढे संतप्त झाले की आयुक्तांच्या विरोधात अविश्वासाचा ठरावही मांडण्यात आला. अधिकाऱ्यांच्या या बहिष्कारनाटय़ामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे महानगरपालिकेची मंगळवारी झालेली महासभा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या सभेत संकरा नेत्रालयासह अनेक ठराव मांडण्यात आले होते. त्यातील प्रशासनाच्या सोयीचे काही ठराव नामंजूर झाले तर काही स्थगित करण्यात आले. विषयपत्रिकेवर अनेक विषय असल्याने ही महासभा काल दुपारी 2 वाजता पुन्हा घेण्यात आली. तशी घोषणाच बुधवारी पालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले यांनी केली होती. प्रशासनाने महासभा लावूनदेखील आज प्रत्यक्ष सभागृहात पालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. खुद्द आयुक्त संजीव जयस्वाल किंवा अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, राजेंद्र अहिवर यांच्यापैकीदेखील कोणीही उपस्थित नव्हते. महापौरांच्या डायसवरील अधिकाऱ्यांच्या सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या.

सचिवांवर कारवाई करा!
गणेशोत्सवापूर्वी ठाणेकरांच्या हिताची तसेच अन्य विकासकामासंबंधीचे अनेक ठराव आज मांडण्यात येणार होते, पण प्रत्यक्ष महासभा सुरू झाली तेव्हा अधिकारी, आयुक्त, सचिव यांपैकी कुणीच नसल्याने सभा चालवायची तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला. सचिवांनी अधिकृतपणे जाहीर केलेल्या महासभेला स्वतःच दांडी मारल्याने त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी केली. महासभेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते, पण प्रशासन तसेच खुद्द आयुक्त जर महासभेवर बहिष्कार घालत असतील तर विकासकामे होणार तरी कशी? असा सवाल करीत महापौर व लोकप्रतिनिधींचा घोर अवमान झाल्याचे सांगत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली.

आयुक्तांनी व्हॉट्सऍपवरून दिली धमकी;
महासभेत गेलात तर याद राखा.. सस्पेंड करू!

प्रशासनाच्या सोयीचे ठराव मंजूर न झाल्याने संतप्त झालेले आयुक्त संजीव जयस्वाल एवढे रागावले की त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना महासभेत गेलात तर याद राखा.. सस्पेंड करू, अशी धमकी व्हॉट्सऍपवर दिली असल्याचा गौप्यस्फोट सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी केला. ते म्हणाले, आज दुपारपासूनच ‘साहेब’ नाराज आहेत, त्यामुळे महासभा पुढे ढकला असे अधिकाऱ्यांचे फोन येत होते. त्यामुळे नगरसेवक आणखीनच भडकले.  

निषेधासाठी स्वतंत्र महासभा बोलवणार.
काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी प्रशासनाच्या दादागिरीविरोधात आपण आयुक्तांचा निषेध करीत असून अविश्वास ठराव मांडत असल्याचे सांगितले. या ठरावाला शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी पाठिंबा दिला. त्यावरून सर्व नगरसेवकांमध्ये जोरदार चर्चा झाली.

महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही आपण प्रशासनाचा निषेध करीत असून महासभा तहकूब करण्याची घोषणा केली. तसेच प्रशासनाच्या निषेधासाठी स्वतंत्र महासभा लवकरच घेणार असल्याचे जाहीर केले.

चुकीचे विषय चव्हाट्यावर आणल्यानेच प्रशासन बिथरले..
महासभेत अधिकारी, आयुक्त उपस्थित नसणे ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रशासनाच्या सोयीचे बोगस विषय चव्हाट्यावरआणले म्हणूनच आयुक्तांना राग आला असावा. ते स्वतः तर आले नाहीच पण अधिकाऱ्यांवर दबाव आला असेल तर ही बाब सहन केली जाणार नाही. यापूर्वीही दोन वेळा प्रशासनाने वॉकआऊट केला होता. मी संपूर्ण ठाणेकरांची महापौर असून लोकांमध्ये एकटी फिरते, पण अधिकारी मात्र दहा-दहा बॉडीगार्ड घेऊन फिरतात. मी आयुक्तांपुढे कधीच तडजोड केली नाही. मात्र नगरसेवकांनी ही परिस्थिती स्वतःवर ओढून घेतली असून त्यांनी एकी दाखवायला हवी. – मीनाक्षी शिंदे (महापौर)

सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही महासभा आहे.  नगरसेवक एखाद्या विषयावर चर्चा करीत असतील तर अधिकाऱयांनी नाराज होण्याचे कारण काय? काही विषय मंजूर तर काही नामंजूर झाले म्हणून अधिकाऱयांनी सभागृहातच येऊ नये ही बाब अत्यंत चुकीची असून त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावला आहे. मात्र यापुढे असे होऊ देणार नाही.
– नरेश म्हस्के (सभागृहनेते)

 

हा तर समस्त ठाणेकरांचा अपमान..
महासभेवर अधिकाऱ्यांसह आयुक्तांनी बहिष्कार घालणे समस्त ठाणेकरांचा अपमान आहे. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असून हा अपमान आम्ही सहन करणार नाही. सर्व नगरसेवक याबाबत महापौरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.
– मिलिंद पाटील (विरोधी पक्षनेते)

#ThaneLive

371 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.