खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने डोंबिवली मेट्रोचे स्वप्न साकार होणार.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने डोंबिवली मेट्रोचे स्वप्न साकार होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबर रोजी भूमिपूजन.

ठाणे – डोंबिवली मार्गे कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाची सर्वप्रथम मागणी करून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीए स्तरावर गेली अडीच वर्षे सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून येत्या ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे.
खा. डॉ. शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह डोंबिवली मार्गे कल्याण-शीळ-तळोजा मेट्रो मार्गाची सर्वप्रथम मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. २१ ऑक्टोबर २०१६ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन या मेट्रो मार्गाचे सविस्तर सादरीकरण खा. डॉ. शिंदे यांनी केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ही याप्रसंगी उपस्थित होते. कल्याण, डोंबिवली, २७ गावे, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसराची लोकसंख्या प्रत्येक दशकात कशा प्रकारे वाढत आहे, याची आकडेवारी सादर करतानाच कुठल्या मार्गाने मेट्रो नेल्यास अधिकाधिक लोकसंख्येला तिचा लाभ होईल, याचे अभ्यासपूर्ण सादरीकरण खा. डॉ. शिंदे यांनी केले होते. 
त्यामुळे प्रभावित होत फडणवीस यांनी त्याच बैठकीत तात्काळ या मेट्रो मार्गाला हिरवा कंदील दाखवत डीपीआर तयार करण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले होते. त्यानुसार खा. डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेऊन त्यांच्या समोरही सादरीकरण केले होते.
त्यानंतर एमएमआरडीएने सदर मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनची नियुक्ती केली. सदर डीपीआर लवकरात लवकर तयार होऊन त्यास मंजुरी मिळावी यासाठी देखील खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच एमएमआरडीएच्या स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला होता. २०१७च्या ऑगस्ट महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व खासदार व आमदारांची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे झाली होती, त्याही वेळी खा. डॉ. शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
या सर्व प्रयत्नांना यश येऊन २१ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मंजुरी दिली होती. तसेच, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळानेही २५ किमीच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिली होती.
सदर मेट्रोचा मार्ग APMC मार्केट कल्याण- गणेश नगर- पिसवली गाव- गोलिवळी- डोंबिवली MIDC- सागाव- सोनारपाडा- मानपाडा- हेदूटणे- कोळे गाव- निळजे गाव- वडवली- बाळे गाव- वाकळण- तुर्भे- पिसवे डेपो- पिसवे- तळोजा असा आहे.
सदर मेट्रोचे प्रशासकीय काम जलद गतीने पूर्ण केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि एमएमआरडीएचे आभार खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी मानले.

681 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.