नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीचा इतिहास.

नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीचा इतिहास.

ठाणे लाईव्ह :- नवरात्रोत्सवात मुंबईसह भारतभर लागणाऱ्या राजकीय तसेच सामाजिक बॅनरवर ज्या आदिशक्तीचा फोटो वापरला जातो अशा ठाण्यातील टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव उत्सवाला सुरुवात होत आहे. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात अक्षरशः लाखो भाविक येतात. या नवरात्रोत्सवाची मुहूर्तमेढ शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी रोवली आहे. या नवरात्रोत्सवाची भव्यता, धार्मिकता आणि देवीची मिरवणूक व आरास म्हणजे भाविकांसाठी दुर्मीळ पर्वणीच ठरते. यंदा काल्पनिक महालाचा देखावा पाहावयास मिळणार आहे. प्रवेशद्वाराच्या शिखरावर असलेली भारतमातेची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

पारंपारिक पद्धतीने देवीची मिरवणूक

या नवरात्रोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे ‘देवीची मिरवणूक’. या देवीच्या आगमनाची मिरवणूक कळवा परिसरातून निघते. पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात, लेझिमच्या तालावर, सुशोभित केलेल्या आकर्षक रथात अंबेमातेच्या मुर्तीची वाजत-गाजत मिरवणूक निघते. पारंपारिक मैदानी खेळ, आदिवासी लोकनृत्य, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ आणि फटाक्यांची आतषबाजी असा स्वरुपाची नयनरम्य मिरवणूक पाहण्यास दुतर्फा गर्दी होते.

ठाण्यातील टेंभी नाका येथे मिरवणूक येईपर्यंत चौकाचौकात रंगेबेरंगी रांगोळ्या काढलेल्या असतात. देवीची विसर्जन मिरवणूक देखील अशा प्रकारची भव्यदिव्यच असते. देवीचा विसर्जन मिरवणूक रथ मनमोहक अशा विद्युत रोषणाईने सजवलेला असतो. ही मिरवणूक देखील एक सुंदर अनुभव असतो. या उत्सवात दरवर्षी कलावंत, नाट्य कलाकार, टीव्ही स्टार, संगीतकार, इतिहासकार भक्तिभावाने सहभागी होतात.

टेंभी नाका नवरात्रोत्सवाचा हा आहे इतिहास

१९७८ साली ठाण्यातील टेंभी नाका येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतक एकत्र येऊन या उत्सवाची सुरुवात केली गेली. सामाजिक एकोपा वृध्दिंगत व्हावा, या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होउन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचे प्रबोधन व्हावे हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून ह्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. प्रारंभी अगदी छोटया प्रमाणात या उत्सवास सुरवात झाली. देवीची मुर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करणे, मंडपाची सजावट, परिसर स्वच्छता इ. सर्व कामे करण्यात स्थानिक रहिवासी व कार्यकर्ते उत्साहाने करतात. खरतर या लोकांच्या सहकार्यानेच हा उत्सव उभा राहिला. प्रारंभी देवीची मुर्ती देखील छोटी होती. पण पुढे काळाच्या ओघात उत्सव लोकप्रिय होत गेला, भक्तांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत गेली आणि मग उत्सवाचे स्वरुप ही भव्यदिव्य होत गेले.

१९८०-८१ च्या काळात उत्सवाचे रुपांतर श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था, अशा नोंदणीकृत संस्थेत झाले. आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव आयोजित होऊ लागला. ह्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रोत्सवाच्या काळात देवीची होणारी षोड़षोपचारे पूजा, दुर्गासप्तर्षी पाठ, नऊ दिवसात प्रत्येक तिथीच्या वेगवेगळ्या रुपाप्रमाणे देवीची होणारी पूजा, विजयादशमीच्या दिवशी होणारा लोककल्याण होम ह्या सर्वगोष्टी विधीवत आणि शास्त्रोक्त रीतेने केल्या जातात. देवी बनविण्यासाठी गौरी पूजनादिवशी चांगला मुहूर्त बघून देवीच्या पाटाची पूजा करण्यात येते. तसेच मूर्तिकार शिळकर पूजा करून ओल्या कपड्यात पाटावर शाडूची माती थापतात , त्यासाठी गंगेचे पाणी वापरण्यात येते. पुढे मूर्तिकार संपूर्ण मूर्ती बनवेपर्यंत देवीचे नामस्मरण करत मूर्ती बनवत असतो.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर आता हा नवरात्र उत्सव शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

नवसाला पावणारी अशी ख्याती

ही देवी नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी हिची ख्याती असल्यामुळे लाखो भाविक देवीची ओटी भरण्यास, नवस बोलण्यास व फेडण्यास येतात. आज या उत्सवाला अतिभव्य असे महालक्ष्मी जत्रेचे स्वरुप आले आहे. जवळपास ८०० ते १००० लहान मोठे विक्रेते या जत्रेत येउन आपली उपजिवीका करतात. ह्या नवरात्रोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पंचमीला खेळला जाणारा महाभोंडला. हा भोंडला पारंपारिक पध्दतीने पूर्वपार चालत आलेली गाणी म्हणूनच खेळला जातो. प्रारंभीच्या काळात इथे गरबा देखील पारंपारिक पध्दतेने खेळला जायचा. पण वेळेचे बंधन आल्यामुळे गरबा नृत्य खेळले जात नाही. खरेतर दरवर्षी भक्तांच्या संख्येत वृध्दी होत गेली आणि त्यामुळे ही गरबा नृत्य खेळणे काहिसे अशक्य होत गेले. ह्या नऊ दिवसांच्या काळात भजनांचे विविध कार्यक्रम ही आयोजित केले जातात.
#ThaneLive

4,144 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.