Wed. Mar 29th, 2023

गोर-गरीब जनतेचा पैसा परत करा नाहीतर बडौदा बँकेचे नाव दरोडा बँक करा – खासदार राजन विचारे यांचा बँक प्रशासनाला धक्का.

प्रतिनिधी – रविवार दिनांक १२ नोव्हेंबर २०१७ रोजी बँक ऑफ बडौदा जुईनगर शाखेवर पडलेल्या भीषण दरोड्याची गांभीर्याने दखल घेऊन ज्या खातेदारांचे लॉकर्स फोडण्यात आले आहेत त्या खातेदारांना न्याय मिळवा आणि त्यांची झालेली नुकसान भरपाई त्यांना मिळावी यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी यांनी बँक ऑफ बड़ौदा सेक्टर ११, सानपाडा, जुईनगर रेल्वे स्टेशन जवळ येथे घटनास्थळी भेट दिली.

याभेटीत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने खा. विचारे यांनी या भेटीत अनुउपस्थित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून जाब विचारला व त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ५ तास ठाण मांडून बसले. तत्पूर्वी बँक मॅनेजरला तुमच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला असून एवढ्या मोठया बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक व कोणतीही धोक्याची सूचना देणारे गजर न बसविल्याने या दरोड्यात आपल्या बँकेतील आपण व आपला कर्मचारी जबाबदार असल्याने त्यांना पाठीशी घालू नका असे खासदार राजन विचारे यांनी ठणकावले.

तसेच या बँकेतील ज्या 30 लॉकर धारकांचे लॉकर फोडले व 48 रिकामे लॉकर का फोडले नाहीत याचा जाब विचारते क्षणी बँक मॅनेजर सीमा कुमाश्री यांनी आम्ही लॉकर मध्ये काय ठेवतोय याची आम्ही माहिती ठेवत नाही असे उत्तर दिले. त्यावेळी विचारे यांनी लॉकर मध्ये उद्या बॉम्ब ठेवलात तर तुम्ही काय कराल ? असा सवाल उभा केला त्यामुळे या लॉकर धारकांचे पैसे परत कधी करणार असे विचारले असता याचा वरिष्ठ निर्णय घेतील असे उत्तर खासदारांना मिळाले. त्यावेळी बँकेचे डी आर एम बाबू रवीशंकर आल्यानंतर 30 लॉकर धारकांची रक्कम परत देण्याची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आल्याने बँकेचे नुकसान झाल्यास याला शिवसेना जबाबदार राहणार नाही अशी तंबी खासदारांनी दिली. नंतर खासदार विचारे यांनी पैसे परत देण्याची जबाबदारी बँकेची असेल असे लिहून घेतले आणि त्यानंतर शिवसैनिक शांत झाले.

505 Views
Shares 0