वाहन चालक भरती घोटाळा. ठाणे महानगरपालिकेची वाहन चालक भरती स्थगित.

ठाणे महापालिकेच्या भरतीमध्ये महापालिका अधिका-यांच्या जिल्ह्यातील युवकांना झुकते माप मिळत असल्याचा दावा काल झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. माजी महापौर अशोक वैती यांनी प्रतिनियुक्तीवर आलेले तसेच महापालिकेच्या सेवेत असलेले काही अधिकारी स्वत:च्या जिल्ह्यातील तरूणांना भरतीमध्ये झुकतं माप देत असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत केला. सभागृहात विविध नगरसेवकांनी यावरून प्रशासनाला धारेवर धरलं. महापालिकेमध्ये गेल्या काही वर्षात झालेल्या भरतीमध्ये बीड, नांदेड, मालेगाव अशा जिल्ह्यातील रहिवाशांची संख्या मोठी असल्याचं सांगून एकूणच या भरती प्रक्रियेवर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी संशय व्यक्त केला. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी मात्र हा आरोप फेटाळत भरती प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शकपणे झाल्याचाच दावा केला. महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आरक्षक पदाच्या भरतीत जिल्हानिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादीच सादर करत भरती प्रक्रियेविषयी संशय व्यक्त केला. पालिकेच्या नोकर भरतीत वारंवार अन्य जिल्ह्यातील उमेदवारांची निवड होत असल्यामुळं जिल्ह्यातील उमेदवार सक्षम नाहीत का असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित करत वाहन चालकांच्या भरती प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी केली. नगरसेवकांच्या मागणीनुसार महापौरांनी या भरती प्रक्रियेस स्थगिती दिली.

तसेच यावेळी पालिका भरतीमध्ये भूमिपुत्रांना ५०% आरक्षण मिळावे अशी मागणी देखील शिवसेनेतर्फे करण्यात आली. या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी देखील हिरवा कंदील दिला.

502 Views
Shares 52