
ठाण्यामध्ये विकास हस्तांतरण हक्क देण्यात दीडशे कोटी रूपयांचा घोटाळा – संजय घाडीगावकरांचा आरोप
ठाण्यामध्ये विकास हस्तांतरण हक्क देण्यामध्ये सुमारे दीडशे कोटी रूपयांचा घोटाळा झाला असून याप्रकरणी जबाबदार असणा-या सर्वांवर फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांना निलंबित करावं अशी मागणी माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी केली आहे.
विकास हस्तांतरण हक्क घोटाळा प्रकरणाची माहिती देण्यासाठी घाडीगावकर यांनी बोलवलेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र पाठवलं असून त्यांच्याकडे ही मागणी केल्याचं सांगितलं.
महापालिका प्रशासनानं एका प्रकरणात सेवा रस्ता अस्तित्वात असतानाही सेवा रस्ता अस्तित्वात नाही असं दर्शवणारा आराखडा मंजूर केला आहे. याच प्रकरणात एका बांधकाम व्यावसायिकाला एक न्याय तर दुस-याला दुसरा न्याय असा आरोप केला असून ५५ हजार चौरस फूटाचा विकास हस्तांतरण हक्क देण्यात आला आहे आणि यामुळं संबंधित बांधकाम व्यावसायिक २९ मजल्याची इमारत बांधणार आहे.
सेवा रस्त्यासंदर्भातील सर्व नियम आराखडा मंजूर करताना धाब्यावर बसवण्यात आले असून याप्रकरणी महापालिकेच्या सर्व्हेअर पासून महापालिका आयुक्तापर्यंत सर्वांची चौकशी करून त्यांना निलंबित करावं अशी मागणी संजय घाडीगावकर यांनी केली आहे. घाडीगावकर यांनी माहितीच्या अधिकारात ही सर्व माहिती मिळवली आहे. या प्रकरणातील आराखडा रद्द झाल्यास ७२ सभासदांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही घाडीगावकर यांनी यावेळी बोलताना केली. या प्रकरणातील भूखंडाचं विभाजन करताना चुकीच्या पध्दतीनं विभाजन करण्यात आलं असून एका प्लॉटला तर येण्या-जाण्याचा मार्गही नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
या संपूर्ण प्रकरणात कर्तव्यात कसूर करणा-या अधिका-यांची चौकशी करावी, तोपर्यंत त्यांना निलंबित करावं, त्यांनी दिलेल्या मंजु-या रद्द कराव्यात अशी मागणी संजय घाडीगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.