
कळव्यात कवी करणार सामाजिक-राजकीय समानतेसाठी एल्गार. देश आमचा देव नाही, देह आहे, तरी आम्ही बोलू नये?? कवी विचारणार सवाल.
ठाणे (प्रतिनिधी)- देश आमचा देव नाही, देह आहे; तरी आम्ही बोलू नये? असा सवाल उपस्थित करणारे वैचारीक वादळी कवीसंमेलनाचे आयोजन कळवा येथे करण्यात आले आहे.
या कवीसंमेलनामध्ये सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यात येणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिली.
संघर्ष आणि सांस्कृतिक कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि माजी नगरसेविका मनाली पाटील यांच्या पुढाकाराने या वैचारीक वादळी कवी संमेलनाचे आयोजन रविवार दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता न्यू कळवा हायस्कूलचे पटांगण, कळवा येथे करण्यात आले आहे. त्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या पत्रकार परिषदेला कवी आकाश सोनावणे, सुमीत गुणवंत, दीपक पारधे, जगदीश भोईर आदी उपस्थित होते.
या कवी संमेलनाची संकल्पना ही सामाजिक आशय आहे. या कवी संमेलनामध्ये कवयित्री रमणी, नितीन चंदनशिवे, सागर काकडे, अंकुश आरेकर, सुमीत गुणवंत, दीप पारधे, रवींद्र कांबळे आणि आकाश सोनावणे हे कवी आपल्या रचना सादर करणार आहेत. सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक तसेच विद्यमान परिस्थितीवर भाष्य करणाऱया कवितांचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
या कवी संमेलनात प्रवेश खुला असून ठाणेकर नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मिलींद पाटील यांनी केले आहे.