नवी मुंबईत पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार. खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश.

नवी मुंबई:-
मार्च २०१८ पर्यंत देशात २५१ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असून महाराष्ट्रात १६ केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील अशी माहिती विदेश मंत्रालयाच्या सचिवांनी शुक्रवारी दिली आहे. त्यात आपल्या ठाणे लोकसभा मतदार संघातील नवी मुंबई शहराचा समावेश आहे,असे खासदार राजन विचारे यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले. 

देशातील नागरिकांना  त्यांच्या जिल्ह्यातच  पासपोर्ट मिळावा यासाठी विदेश मंत्रालयाने “पासपोर्ट आपल्या दारी” या तत्वानुसार देशभरात 251 पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रात 20 पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.   मागील 6 महिन्यात देशभरात 62 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात आले आहेत.  

ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे, नवीमुंबई व मिरा-भार्इंदर ही महानगरे येतात. त्यातील नवी मुंबई येथे लोकसंख्या वाढत असल्याने तसेच सध्याच्या नागरिकांसाठी पासपोर्ट ची झटपट कामे व्हावीत यासाठी *नवीमुंबईत ‘पासपोर्ट सेवा केंद्र’ व्हावे यासाठी खासदार राजन विचारे यांनी सतत प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी थेट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची ६ जुलै २०१७ रोजी दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याकडे नवी मुंबईत केंद्र सुरू करण्याबाबत मागणी केली होती. विचारे यांच्या विनंतीला मान देऊन नवीमुंबईत जागेचा शोध घेऊन तेथे हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे आश्वासन स्वराज यांनी विचारे यांना दिले होते. खासदार राजन विचारे यांनी संबंधित अधिका-यांकडेही पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नानाना यश मिळाले असून महाराष्ट्रातील १६ पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. 

केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता प्रत्यक्षात येत्या तीन महिन्यात नवी मुंबईतील शहरवासियांसाठी नवी मुंबईत हे कार्यालय सुरू करण्यासाठी  सरकार पातळीवर सर्व प्रयत्न केले जातील, असेही खासदार विचारे यांनी सांगितले.

‘विचारे यांच्या सततच्या प्रयत्नांना यश’

नवी मुंबई शहर वेगाने विकसित झाले असून पासपोर्ट काढण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांचे काम झटपट व्हावे यासाठी माझा प्रयत्न आहे. पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी गेले तीन ते चार महिने आपण प्रयत्नशील होतो. अखेर सरकारकडून हे काम मंजूर झाल्याबद्दल परराष्ट्र मंत्री व या खात्याच्या संबंधित अधिका-यांचे खासदार राजन विचारे यांनी आभार मानले आहेत. 

*ही असतील राज्यातील १६ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र*

महाराष्ट्रात जी नवीन १६ पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत यामध्ये सिंधुदुर्ग, वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई नॉर्थ सेन्ट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल,घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव या जिल्यांचा समावेश आहे. या 16 नवीन पासपोर्ट केंद्रामुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची  एकूण संख्या 27 होणार आहे अशी माहितीही देण्यात आली. 

547 Views
Shares 0