
का घडवले जाते भीमा-कोरेगाव????
२०१८ या वर्षाची सुरुवातच ऐतिहासिक आणि कलंकित गोष्टी ने झाली. समाज कंटकांनी त्यांचा हेतू साध्य केला , समाजातील विविध घटक सुद्धा आपआपली जबादारी पार पाडण्यात कमी पडले . १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून बहुजन समाज उपस्थित राहिला होता. लोकांमध्ये उत्साहाचे, स्नेहाचे वातावरण होते. एकजुटीचा संदेश त्या मधून दिसत होता. पण ही एकजूट काही समाज कंटकांना रुचली नाही. त्यामुळे त्यांनी लोकांवर दगडाने आणि मिळेल त्या गोष्टीने हल्ला करायला सुरुवात केली. हल्ला करणारे लोक हे टोळक्यांमध्ये विखुरलेले होते. जो भगवा झेंडा हा महाराजांच्या स्वराज्याचा प्रतीक आहे आणि एकतेचा प्रतीक आहे त्या पवित्र झेंड्याने असे नीच काम त्या दिवशी केले जात होते. महाराजांच्याच बहुजन मावळ्यांवर असे भ्याड हल्ले केले जात होते. जे हल्लेखोर होते त्यांच्या हातामधील भगवा झेंडा हा रस्त्यावर लोळत होता या वरून त्यांना स्वतःला किती भगव्या झेंड्या बद्दल आदर आहे ते दिसून येत होते. हे गुंड तिथे बाहेरून आणले गेले होते असा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. याआधी १९९ वर्षे कधीही काहीही झाले नाही , उलट स्थानिकांचे सहकार्य मिळत होते ,पण ह्याच वर्षी जाणून बुजून पूर्व नियोजित हा कट करण्यात आला. पण अंतिमतः या सर्व कटाची जबाबदारी तेथील प्रशासन आणि सरकार वर येऊन पडते !!
पोलिसांना ह्या वर्षी लोक जास्त येणार हे माहीत असूनही नियोजनासाठी मुबलक पोलीसबळ दिले गेले नाही , जेवढे पोलीस दल होते ते सुद्धा प्रत्यक्ष स्थळी कारवाई करण्यास सक्षम ठरले नाही. तेथील उपस्थित पोलीसांना लोकांनी सूचना देऊन सुद्धा पोलीस वरून आज्ञा नव्हती म्हणून काहीच करत नव्हते. पोलिसांनी तिथे कोणाची आज्ञा येते का नाही याची वाट बघणे चुकीचं होते , स्वतःच्या विवेक बुद्धीने जरी प्राथमिक कारवाई केली असती तरी भरपूर गोष्टी नियंत्रणात आणता आल्या असत्या. यासाठी सरकार ने पुणे ग्रामीणच्या अधीक्षकाकडून त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित का पाळली नाही याचा जाब विचारला पाहिजे होता , पोलिसांवर कोणते दडपण त्या वेळी देण्यात आले होते का?? याचा खुलासा झाला पाहिजे.
कोणताही सण किंवा कोणताही मोठा सामाजिक कार्यक्रम असला की पोलीस त्यांच्या पातळीवर विशेष खबरदारी घेत असतात , गुंडांना तडीपार करणे , लोकांना सूचना देणे, गुप्त हेर खात्या द्वारे माहिती मिळवणे , पण ह्या सगळ्या आघाडीवर प्रशासन अपयशी ठरले. एक महिना आधीपासून ही सर्व तयारी चालू होती अशा बातम्या येत होत्या , दगडी जमा केली जात होती तरी याचा पोलिसांना सुगावा लागला नाही हे एक आश्चर्य आहे .
ही सर्व घटना ज्या दिवशी घडली त्याची सगळे व्हिडिओ फुटेज उपलब्ध होते तरी सरकार ने संबंधितांवर दिवसभर कारवाई का केली नाही?? त्या नंतर सुद्धा २ जानेवारी ला सरकार ह्या घटनेच्या स्पष्टीकरणासाठी पुढे येत नव्हते , कारवाई संबधी बोलत नव्हते. दुपार नंतर लोकांचा संयम सुटायला लागला आणि जनआक्रोश वाढू लागला , त्यात महाराष्ट्रातील वजनदार राष्ट्रीय नेत्याने प्रतिक्रिया दिली. त्यानंतर मीडिया ला पण आता हे प्रकरण जास्त वेळ दाबून ठेवता येणार नाही याचा अंदाज आल्यामुळे त्यांनी सुद्धा थोडे थोडे दाखवायला सुरवात केली. ते पण जाणून बुजून चुकीचे मथळे दाखवून. सर्वात शेवटी सरकारला जाग आली आणि लोकांसमोर भूमिका मांडायला सुरवात केली पण त्यामध्ये पण ते त्यांची भूमिका वेळ मारून नेण्याची आहे असेच लोकांना वाटू लागले. आणि ३ जानेवारी ला आपल्या वर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बंद पाळण्यात आला. 2 दिवस उलटून पण संबधितांवर कारवाई होत नाही वरून मीडियाद्वारे आधी दुर्लक्ष करून नंतर त्याला वेगळेच वळण द्यायला सुरवात झाली होती. आणि या प्रकरणाला वेगळेच फाटे फोडण्याची तयारी केली जात होती. त्या सगळ्या वरील उद्रेकाचे परिवर्तन हिंसेत झाले .
या सगळया प्रकरणामध्ये काही मीडिया ने एकतर्फी भूमिका घेतली होती. १ जानेवारीला बहुजनांवरच्या हल्ल्याचे फुटेज जाणून बुजून त्या दिवशी दाखवले नाही. त्यावर लोकांकडून प्रतिक्रिया आल्यानंतर त्याच दिवशी दाखवले असते तर दंगल अजून उसळली असती अशी सोयीची भूमिका मीडिया ने मांडली. मग जर हाच तर्क धरला तर 3 जानेवारीला महाराष्ट्र बंद च्या हिंसेचे फुटेज का बरे लाईव्ह आणि सारखे सारखे दाखवले जात होते. त्याने दंगल भडकत नव्हती का?? मीडिया ला असे पक्षपाती राहून चालणार नाही , नाहीतर लोकांचा असला नसलेला थोडा विश्वास पण उडून जाईल. आजकाल च्या सोशल नेटवर्किंग च्या युगात माहितीसाठी आणि लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मीडिया वर विसंबून राहावे लागत नाही , हे त्या दिवशी मीडिया ने हे प्रकरण इतके दाबून धरून सुद्धा सोशल मीडिया द्वारे बाहेर पडलेच. मीडिया ने हे लक्षात घ्यावे की अमेरिके मध्ये पण डोनाल्ड ट्रम्प यांना मीडिया ने वाळीत टाकले होते तरी सुद्धा सोशल मीडिया च्या प्रचारावर प्रचंड मतांनी ते निवडून आले. असेच चालू राहिले तर लोक तुम्हाला गंभीर पणे न घेता फक्त एक मनोरंजन म्हणून घेतील .चुकीचे मथळे देऊन दोन जाती मध्ये भांडणे लावायचे काम मीडिया करत होती, हे प्रकरण शांत कसे होईल हे बघण्यापेक्षा दोन समाजातील लोकांमध्ये वितुष्ट कसे निर्माण होईल ह्या हेतूने जाणुन बुजून ठराविक व्हिडिओस दाखवले जात होते . आणि ह्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून ज्यांची नावे पुढे येत होती त्यांना लोकांमधून कशी सहानभूती मिळेल अशा प्रकारचे व्हिडिओस बनवून चित्रीकरण केले जात होते .असे वाटत होते जणू मीडिया त्यांचे ‘आत्मचरित्रच’ सांगत आहे .
संभाजी महाराजांची विटंबना झाल्यानंतर तत्कालीन विरोध पत्करून एका दलित व्यक्तीने संभाजी महाराजांचा अंत्यविधी आपल्या जागेत करवून घेतला. त्या नंतर त्यांची सुद्धा त्या वेळच्या काही जातीयता मानणाऱ्या लोकांकडून मुघलांच्या साथीने हत्या करण्यात आली. या शूर व्यक्तीची सुद्धा समाधी तिथे आहे. ह्या दोन्ही समाधीचे दर्शन घेण्यासाठी भरपूर बहुजन लोक तिथे जमा होतात. हा १ जानेवारी चा दिवस ऐतिहासिक होता आणि बहुसंख्येने बहुजन समाज एकजूट तिथे होणार आहे असा अंदाज होता. या ठिकाणी त्यांना प्रेरणा मिळेल, जातीभेद विसरून ते विकासाच्या मागे लागतील मग आपले हितसंबंध धोक्यात येतील. या भीतीने काही समाज विघटक वृत्तींनी हा कट घडवून आणला. संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी सुद्धा अराजकता माजवली. आणि पेशव्यांच्या त्या वेळच्या अत्याचाराविरुद्ध ची लढाई म्हणजे हिंदूंच्या विरोधातली किंवा मराठ्यांच्याविरोधातील लढाई असे दाखवण्याचा प्रयत्न संधी साधू आजचे पेशवे करत होते . मीडिया ने ह्या वादाला ‘मराठा – दलित’ असे रूप दिले. हा ‘पेशवा- दलित’ वाद असताना मराठ्यांचा काहीही संबंध नसताना त्यांना या वादात ओढुन भडकवण्याचे काम सुरू केले .ज्यांना याची पार्श्वभूमी माहीत नाही असा मराठा-दलित तरुणांना सोशल मीडिया च्या माध्यमातून छुप्या पद्धतिने भडकवण्याचे “पेशवाई” काम सुरू झाले. बहुजनांची एकी तोडण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जात होते .बहुजनांचा वर्ग अजून ही मोठया प्रमाणात कष्टकरी-शेतकरी असा वर्ग आहे. त्यांच्या पर्यंत बोद्धीक विचार अजून पर्यंत पोहचलेले नाहीत, तंत्र कुशलता ही जास्त नाही. याचाच फायदा घेऊन त्यांचा बुद्धी भेद करण्याचा छुपा प्रकार त्यांच्या मध्ये घुसून तुमचाच मी आहे असा दाखवून चालू होता .
जेव्हा पुण्यामध्ये मराठा समाजाच्या महिलेला जातीमुळे घरकाम नाकारून तिच्या वरच उलटा गुन्हा दाखल केला गेला होता तेव्हा का नव्हते फिरत तिच्या समर्थनार्थ असे मेसेजेस सोशल मीडियावर, कोण आहेत हे लिखाण करणारे ? ज्या फेसबुक पेजवरून वा वॉट्सअँप वरून हे भडकाऊ मेसेजेस आता येत आहेत त्या वेळी असे मेसेजेस येत होते का याचा आपण विचार केला पाहिजे. इतिहास हा इतिहास असतो आणि सत्य देखील असतो. ही लढाई पेशव्यांविरुद्ध ‘स्वाभिमानाने न्यायासाठी’ लढलेली होती पण त्यात पेशव्यांचा पराभव झाल्या नंतर तो पचवणे जड जाणार म्हणून मग अशी खोटी तुनतुने सोडून दिले की ही लढाई ‘बहुजन विरुद्ध पेशवा’ नाहीतर ‘इंग्रज विरुद्ध मराठा’ अशी होती. “एवढ्या वर्षाची गुलामी हरली आणि न्याय जिंकला !”हे कसे त्यांना सहन होणार होते. “जिंकले की पेशवे आणि हरले की मराठे !! “अशी प्रथाच त्यावेळी त्यांनी सुरू केली होती. आणि मराठेशाही तर पेशव्यांनी उत्तरे मधील मराठा सरदारांमध्ये आपापसात भांडणे लावून कधीच धुळीत मिळवली होती. इंदोर चे होळकर पुण्याच्या पेशवा वर चाल करून आले म्हणून पुण्याचा पेशवा सर्वात आधी इंग्रजांना शरण गेला होता. पानिपतच्या युद्धाच्या इतिहासातून संदर्भ घेतला की असे समजते , पेशवे सदाशिव राव हे होळकरांचा वृद्ध म्हणून अपमान करत असे त्यावर इतिहासात अशी नोंद आहे की , मल्हारराव होळकरांनी एकदा संतप्त होऊन म्हटले ” जर शत्रू ने पुण्याच्या या ब्राह्मणाला पराभूत केले नाहीतर हा भाऊ एक दिवस आम्हाला आणि इतर मराठा सरदारांना स्वतःचे कपडे बनवण्यास लावतील !!” , होळकरांना जातीय विशेषण लावून पेशवे अपमानित करत असे त्याच बरोबर उत्तरेच्या मराठा सरदारांना एकमेकांत भडकवत असे आणि दुसऱ्या बाजीराव पेशवाने विठोबा होळकरला कुटणीतीने ठार केला होता , स्वतःची गादी स्थिर राहण्यासाठी मराठयांच्या शूर सरदारांची एकामागोमाग एक हत्या करत होता , जेव्हा याची कुटणीती ओळखून होळकर त्याच्या वर चालून गेले तेव्हा याने इंग्रजां कडे स्वतःच्या रक्षणासाठी भीक मागितली व इंग्रजांच्या सैनिकांच्या संरक्षणात राहू लागला , त्याबदल्यात मराठा सरदारांनी रक्त सांडून जिंकेलेली सुरत सारखी स्वराज्याची लक्ष्मी , गुजरात नर्मदा तापी सारखा सुपीक प्रदेश स्वतःच्या मूर्खपणामुळे इंग्रजांना तहात देऊन बसला होता आणि इंग्रजांच्या कृपेवर जगत होता. मग जर अशा सत्तेविरुद्ध दलित लढा जिंकले त्यात वाईट काय? “सर्व त्या वेळच्या मराठा सत्तेला आणि जनतेला पेशवे पराभूत व्हावे असेच वाटत असताना त्यांना दलितांनी इंग्रजांद्वारे हरवले त्यात वाईट ते काय ?” ज्या पेशव्यांनी आपले इमान कधीच इंग्रजांकडे गहाण ठेवले होते आणि त्या नंतर आपले हितसंबंध जपले जात नाहीत म्हणून परत इंग्रजांविरुद्ध लढाई सुरू केली ! ज्याला काहीच अर्थ नव्हता कारण” जो बुंद से गयी वो हौद से नई आति !” आणि त्या काळातील सर्वात भित्रा शासन कर्ता म्हणून तो प्रसिद्ध आहे आणि या काही दोन दिवसांमध्ये त्याच्या पराक्रमाच्या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत उलट तो इंग्रजांना परत शरण जाऊन लाजिरवाणे जीवन जगण्यास तयार झाला. हाच संभाजी महाराजांमध्ये आणि पेशवाई मध्ये फरक आहे. महाराजांच्या देहाचे तुकडे झाले पण तडजोड केली नाही .
जेव्हा मनुवादी लोकांच्या अंगावर एखादी गोष्ट शेकते तेव्हा ते धर्माचा आधार घेतात. लोकांना असे भडकवितात की हे अमुक अमुक हिंदू च्या विरोधात आहे म्हणजे कोणीही त्यांच्या विरोधात आवाज उठवला की तो आवाज हिंदू विरोधात आहे असा खोटा प्रचार ते करत असतात. स्वतः घरा मध्ये बसुन तुपा मधाच्या पोळ्या खायच्या आणि बाहेर बहुजनांना भडकवून त्यांचे आयुष्य बरबाद करतात आणि हा समाज शिक्षण न घेता कसा आपल्या मागे फिरत राहील याची तरतूद आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतात !
सर्व समाजांमध्ये रोजगाराची चिंता आहे ,नैराश्य आहे ,प्रचलित व्यवस्थेविरुद्ध राग आहे ,तो बाहेर येईल असे वाटले की असे काही तरी घडवून आणून दंगली भडकवायच्या आणि स्तब्ध शासनकर्ते म्हणून बघत राहायचे. सरकार ने आता जी न्यायालयीन समिती नेमली आहे तिला वेळमर्यादा ठरवून द्यावी म्हणजे जलद न्याय मिळण्यास मदत होईल . शिवाजी महाराजांनी सगळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य घडवले होते आणि याचे भान ठेवून त्याचीच पुनरावृत्ती सगळीकडे , सगळ्या द्वारे व्हावी ….!!!!
लेखक :- प्रशांत डावखर.