
जेष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी यांना ”जनकवी पी .सावळाराम पुरस्कार” तर जेष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री जयश्री टी. यांना ”गंगा जमुना पुरस्कार”
ठाणे : ठाणे महापालिका व जनकवी पी.सावळाराम कला समिती यांच्यावतीने दिला जाणारा पी .सावळाराम पुरस्कार जेष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी यांना तर अभिनेत्री जयश्री टी यांना गंगा जमुना पुरस्कार प्रधान करण्यात आला. ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात आला .
या पुरस्कार वितरण सोहळ्याला सभागृह नेते नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका प्रतिभा मढवी,मृणाल पेंडसे, महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) समीर उन्हाळे,उप आयुक्त संदीप माळवी, पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय पी. सावळाराम, जनकवी पी .सावळाराम कला समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पाठारे आदी उपस्थित होते.
अभिनय क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या व सर्वत्र साईबाबा या नावाने परिचित असलेले जेष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी याना यंदाचा जनकवी पी .सावळाराम पुरस्कार देण्यात आला. हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा व नृत्याचा वेगळा ठसा उमटवलेल्या अभिनेत्री जयश्री टी .यांना” गंगा जमुना” हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी साहित्यिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे व आपल्या कवीतेतून संपूर्ण जनमानसाच्या कवितेचे भावविश्व् निर्माण करणारे जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांना साहित्यिक क्षेत्रातील पी सावळाराम हा पुरस्कार देण्यात आला आहे. निवृत्तीनंतरही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माधुरी ताम्हणकर याना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आला आहे. आपल्या अभिनयातून आणि दिग्दर्शनातून मराठी चित्रपट सृष्टीत वेगळा ठसा उमटवणारे रवी जाधव यांना लक्षवेधी कलावंत पुरस्कार देण्यात आला. सर्व पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले .
पी. सावळाराम यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी जनकवी पी.सावळाराम यांच्या गीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते . पी.सावळाराम यांनी लिहिलेल्या विविध गीतांचे यावेळी सादरीकरण झाले. या समारंभाला ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.