ठाणे महानगरपलिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आज पार पडला. येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान शहरात सुरू राहणार असून संपूर्ण ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचे उद्दिष्ट या अभियानाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यात ठाणे किसन नगर येथील पाईप लाईन, रोड नंबर १६ तसेच रोड नंबर २२ येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. पाईप लाईनला लागून असलेल्या वस्तीमध्ये असलेली घाण आणि कचरा संपूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता दुतांशी संवाद साधून त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला.


यावेळी बोलताना, संपूर्ण स्वच्छता अभियान मुंबईत यशस्वी केल्यानंतर आज ठाणे शहरात देखील त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानात शहरातील सर्व सार्वजनिक स्थळे स्वच्छ करण्यात येणार असून दोन महिने हे अभियान शहरात चालणार आहे. यात ३५०० कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी, संत निरंकारी मंडळ, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ, ठाणे चर्चचे पदाधिकारी असे सारे या अभियानात सहभागी झाले होते. आधी झाडू मारून, साचलेली माती दूर करून त्यानंतर रस्ता धुवून स्वच्छ करावा अशी ही कल्पना आहे. शहरे स्वच्छ आणि सुंदर दिसायला हवीत, यासाठी अनेक हात पुढे आले असून ही एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात अर्बन फॉरेस्ट तयार करावीत, मियावाकी गार्डन तयार करावीत, ऑक्सिजन पार्क तयार करावीत, रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जास्तीत जास्त पाणी जमिनीत साठवून जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुरवण्याचे काम करावे असेही आयुक्तांना सुचवण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी ठाणे महानगरालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगसेवक प्रकाश शिंदे, विभागप्रमुख एकनाथ भोईर, बबन मोरे तसेच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.