यंदा थंडीचा हंगाम लवकर संपणार असल्याचे अंदाज पर्यावरण तज्ज्ञांकडून समजले आहे. वातावरणात मोठे बदल झाल्याचेही दिसून येत आहे. ह्यातच ठाणे शहरातील वातावरणात गेल्या अनेक दिवसांपासून मोठे बदल झालेले दिसून आले आहेत. रात्रीच्या वेळेत वातावरणात थंडी जाणवत असली तरी दिवसा मात्र ठाणेकरांना ऊन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरातील कमाल तापमान चाळीशी वर गेले आहे व किमान तापमान १६ ते २० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले असून यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळेत गारवा जाणवत आहे. अशी माहिती मिळाली आहे.
ठाणे शहरात सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत आहे. पहाटेपर्यंत हा गारवा राहातो, मात्र सकाळनंतर तापमानात मोठी वाढ होत असल्याचे पालिकेच्या तापमान केंद्राद्वारे समजले आले. ठाणे महापालिका क्षेत्रात सहा तापमान केंद्राची उभारणी पालिका प्रशासनाने काही वर्षांपुर्वी केली आहे. याच तापमान केंद्राच्या आधारे गेल्या तीन दिवसातील तापमानाची आकडेवारी पहाता ठाणे शहराचे तापमान चाळीशी वर गेल्याचे दिसून आले आहे.
ठाणे शहराचे तापमान ८ फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस इतके होते. त्यानंतर तापमानात मोठी वाढ होताना दिसून आली.९ फेब्रुवारीला शहराचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. १० फेब्रुवारीला शहराचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस व किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे.११ फेब्रुवारीला शहराचे तापमान ३९ अंश सेल्सिअस – किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेल्याची माहिती ठाणे महापालिका प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली आहे.